आरटीओमुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती

By Admin | Updated: July 28, 2016 02:35 IST2016-07-28T02:35:15+5:302016-07-28T02:35:15+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेली वाहने मसाला मार्केटला लागून असलेल्या भूखंडावर ठेवली आहेत. या वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचून परिसरात डेंग्यू व मलेरियाची

Due to RTO, fear of spreading malaria with dengue | आरटीओमुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती

आरटीओमुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती

नवी मुंबई : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेली वाहने मसाला मार्केटला लागून असलेल्या भूखंडावर ठेवली आहेत. या वाहनांमध्ये पावसाचे पाणी साचून परिसरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरटीओच्या निष्काळजीपणाकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करू लागले आहे.
नवी मुुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय एपीएमसीच्या धान्य मार्केटमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीमध्ये सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शहरातील जुन्या रिक्षा व वाहने जप्त केली जातात. ही वाहने ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने सिडकोकडून उच्चविद्युत दाबाच्या वाहिन्यांखालील भूखंड तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे. मसाला मार्केट व मध्यवर्ती सुविधागृह यांच्या मध्ये हा भूखंड असून तेथे अनेक वर्षांपासून सातत्याने वाहने उभी केली जात आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने आता एकाच वाहनावर पुन्हा दोन वाहने ठेवली जात आहेत. या भूखंडाला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पावसाळा सुरू असल्यामुळे या वाहनांमध्ये पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मसाला मार्केटच्या एम गल्लीमध्ये डास चावल्यामुळे अनेक व्यापारी व कामगार आजारी पडू लागले आहेत. बाजूला असलेल्या मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमधील रहिवाशांनाही याचा त्रास होत आहे.
आरटीओच्या निष्काळजीपणाची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली जाणार आहे. या ठिकाणी तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
येथील भंगार वाहनांचा लवकरात लवकर लिलाव केला जावा, उभ्या असणाऱ्या वाहनांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Web Title: Due to RTO, fear of spreading malaria with dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.