प्राची सोनवणे नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, दरांमध्ये वाढ झाली आहे. या पावसाचा फटका उत्पादनावर बसला असून, हलक्या प्रतिचा माल बाजारात येत आहे. त्यामुळे हा माल टिकवायचा कसा, तसेच या मालाच्या विक्रीबाबत व्यापारी संकटात सापडले आहेत. घाऊक बाजारात दर स्थिरावत असताना किरकोळ बाजारात मात्र दाम दुपटीने भाज्यांची विक्री केली जात आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा परिणाम भाजीपाला विक्रीवर झाला आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ३५ ते ४० रुपयांच्या घरात गेले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या ६० ते ७० रुपये दराने विकल्या जात आहेत. इतरवेळी ६०० ते ६५० गाड्यांची आवक होणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून, वाशीतील घाऊक बाजारात मंगळवारी ८० ट्रक, ४५१ टेम्पो अशा एकूण ५३१ गाड्यांची आवक झाली. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बसत नसल्याने याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने व्यक्त केली. येत्या काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले तर उत्तर भारतातील येणाºया मालाचीही आवक घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नारायणगाव, चाकण, नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात असून, पावसामुळे उत्पादन घटले आहे.>पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत, असे मत भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी व्यक्त करत आहेत. दिवाळीची सुटी संपत आली असून, अनेक जण आता परगावाहून परतणार असून पुन्हा भाजीपाल्याची मागणी वाढेल. मात्र, त्यानुसार पुरवठा न झाल्यास दरवाढीला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.किरकोळ बाजारात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, बाजारात मालच नाही असे कारण पुढे करत किरकोळ विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाज्यांबरोबरीने आता फळांचेही दर वाढू लागले असून, ग्राहकांचा खिसा कापला जात आहे. पैसे देऊनही मात्र चांगल्या दर्जाचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. दर असेच वाढविले तर सर्वसामान्यांनी भाजीपाला खाणेचे बंद करावे काय, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियंका पखाले या गृहिणीने व्यक्त केली.>छटपूजेलाही बाजार कमीचछटपूजेसाठी एपीएमसी परिसरातील बहुतांश व्यापारी वर्ग सुटीवर जात असल्याने बाजार कमी होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे. त्यामुळे पूजेचे दोन दिवस बाजारात भाजीपाल्याची आवक कमीच राहणार असल्याचेही व्यापाºयांनी सांगितले.महिनाअखेरपर्यंत मालाची आवक अशीच राहणार असून, दरवाढीबाबत अनिश्चितता कायम राहील. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही पावसाचा फटका शेतमालावर बसला असून, आवक घटली आहे. परिणामी आवक घटल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारांंमध्ये भाववाढीने उच्चांक गाठला आहे. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, चांगल्या प्रतिचा माल कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तो माल टिकविणे आणि त्याची विक्री करण्याचे आव्हान व्यापारीवर्गासमोर आहे.- प्रशांत जगताप, सचिव, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ
परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्यानं दरांमध्ये दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:22 IST