उलवे टेकडीच्या खोदकामास पावसाचा व्यत्यय
By Admin | Updated: July 6, 2017 06:45 IST2017-07-06T06:45:33+5:302017-07-06T06:45:33+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात

उलवे टेकडीच्या खोदकामास पावसाचा व्यत्यय
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी टेकडीवर सुरुंग पेरून स्फोट घडविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा टेकडी उत्खननाच्या कामात व्यत्यय आला आहे. सुरुंग पेरण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने स्फोटके भरताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा सामावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्त्वाचे आहे. या टेकडीची उंची ९५ मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती ८६ मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे.
झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अलीकडेच टेकडीवर स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर आतापर्र्यंत २७ स्फोट घडविल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी पावसामुळे या कामात व्यत्यय आला आहे.
पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत. त्यासाठी टेकडीवर खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु त्यात पावसाचे पाणी साचल्याने स्फोटके पेरण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्फोटके पेरण्याचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र पावसाची उघडीप होताच या कामाला गती दिली जाईल, असे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राथमिक स्तरावर काम
झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत.