दरड कोसळल्याने महाड-भोर वाहतूक ठप्प
By Admin | Updated: June 24, 2017 00:40 IST2017-06-24T00:40:02+5:302017-06-24T00:40:02+5:30
महाड-भोर-पंढरपूर मार्गावर वाघजाई घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

दरड कोसळल्याने महाड-भोर वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : महाड-भोर-पंढरपूर मार्गावर वाघजाई घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दुपारी दीड वाजता उंबर्डे गावाजवळ हा प्रकार घडला. घटना घडल्यानंतर दीड-दोन तास कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची माहिती एका एस.टी. चालकाने महाड परिवहन स्थानकात दिली. महाड आगाराने महाड बांधकाम विभागाला ही माहिती दिली. घाटात असलेले महाड बांधकाम विभागाचे मजूर घटनास्थळी दाखल झाले. मात्र दरड मोठी असल्याने मजुरांना काहीच काम करता आले नाही. दरड कोसळलेला भाग भोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. महाड बांधकाम विभाग या ठिकाणी जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्री पाठवू शकत नाही. भोर येथून यंत्रसामग्री आल्यानंतर ही दरड हटविण्याचे काम सुरू होणार आहे.
दरम्यान, महाड-भोर मार्गे होणारी एस.टी. आणि अन्य वाहतूक ताम्हिणी आणि महाबळेश्वर मार्गे वळविण्यात आली आहे.