दारूच्या नशेत पोलिसांनाच लावले कामाला, अपघातामुळे रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 9, 2024 13:26 IST2024-03-09T13:24:25+5:302024-03-09T13:26:40+5:30
तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता.

दारूच्या नशेत पोलिसांनाच लावले कामाला, अपघातामुळे रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
नवी मुंबई : स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या तपासात पोलिसांना असा प्रकार घडलाच नसल्याचे समोर आले. तपासादरम्यान संबंधिताने एका अपघात केला असून त्यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला होता.
तुर्भे परिसरात राहणाऱ्या अनिल चौहान (४०) याने अज्ञात चौघांनी त्याला मारहाण करून मोटरसायकल व रोकड लुटून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. शिवाय त्यांनी आपले अपहरण करून काही अंतरावर सोडून दिल्याचेही त्याने सांगितले होते. त्यावरून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, वसीम शेख आदींचे पथक केले होते. त्यांनी चौहान याच्या तक्रारीवरून घटनास्थळ व संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये कुठेही त्याच्या अपहरणाचा प्रयत्न दिसून आला नाही.
मात्र एका ठिकाणी चौहान याचीच मोटरसायकल दोघा पादचाऱ्यांना धडकताना दिसून आली. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते का ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस त यांच्यापर्यंत पोहचले असता अपघातामध्ये जखमी व्यक्ती गावी गेल्याचे समोर आले. यामुळे चौहान याच्यावरच पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्याकडे उलट चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने आपण दारूच्या नशेत मोटरसायकल चालवत असताना दोघांना धडक दिल्याचे सांगितले. मात्र त्यामध्ये ते जखमी झाल्याने आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीमुळे त्याने आपले अपहरण करून अज्ञातांनी मोटरसायकल चोरून नेल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे केल्याचे मान्य केले. याप्रकरणी चौधरी याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.