दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू
By Admin | Updated: September 24, 2015 00:23 IST2015-09-24T00:23:34+5:302015-09-24T00:23:34+5:30
गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहीम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू
प्राची सोनवणे,नवी मुंबई
गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहीम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. पाणी गळती, चोरी व पिण्याच्या पाण्याचा वाहने धुणे व उद्यानासाठीही वापर केला जात आहे.
नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणी पुरविणे शक्य झाले आहे. २०१२ च्या भीषण दुष्काळात राज्यातील सर्व शहरांमध्ये पाणीकपात सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत होता. सद्यस्थितीमध्ये ३६० एमएलडी पाणी धरणातून घेतले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी साठा समाधानकारक असला तरी गतवर्षी २२ सप्टेंबरला मोरबे परिसरात तब्बल २०३५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी फक्त १५५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल ४८५मिलीमिटर पाऊस कमी आहे. सद्यस्थितीमध्ये धरणातील पाणीसाठा मार्चपर्यंतच पुरू शकतो. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र शहरवासी पाण्याची प्रचंड उधळपट्टी करत आहेत. अनेक सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओसांडून वाहत असतात. पाइपलाइनने वाहने व झाडांना पाणी घातले जात आहे. पाण्याच्या उधळपट्टीविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
महापालिका क्षेत्रात १९ टक्के पाणीगळती आहे. यामध्ये पाणी चोरीचाही समावेश आहे. काही हॉटेल व इतर व्यावसायिक चोरून पाणी वापर असल्याचे बोलले जात आहे. पाण्याचा होणारा गैरवापर, पाणीचोरी, या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कडक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार केले आहे. आतापर्यंत ४ हजारपेक्षा जास्त नागरिकांना नोटीस पाठविल्या आहेत.