माथेरानला जलदुष्काळाच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 23:54 IST2021-01-13T23:54:46+5:302021-01-13T23:54:52+5:30
जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

माथेरानला जलदुष्काळाच्या झळा
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : पाणी हेच जीवन हे फक्त कागदावरच राहिले आहे. गेली पाच दिवस एमजेपीकडून माथेरानकरांना मुबलक प्रमाणात पाणी असूनही मिळत नसल्याने माथेरानकर पुरते हवालदिल झाले आहेत. पाणी असूनही दुष्काळाची स्थिती माथेरानमध्ये झाली असून जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
माथेरानला शार्लोट तलाव व नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा होतो. नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा बंद आहे तर शारलेट तलावामधून होणारा पुरवठा विजेचे कारण पुढे करत चालढकल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांसह दुकानदार पाणी नसल्याने हवालदिल झाले आहेत. काही दुकानदारांनी पाणी नसल्याने दुकाने बंद केली आहेत. तर महिलांकडून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माझे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेली पाच दिवस पाणी आले नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी जीवन प्राधिकरणच्या माथेरान कार्यालयात गेलो असता कोणीही अधिकारी येथे हजर नव्हता. आम्हाला पाणी हे वाणिज्य दराने मिळते. असे असताना पाणी मिळत नसताना देखील आम्ही बिल का भरावे? अशी तक्रार स्थानिक रेस्टॉरंट मालक अरविंद शेलार यांची आहे.
नेरळहून जुम्मापट्टी, जुम्मापट्टी ते वॉटर पाईप आणि वॉटर पाईप ते माथेरान असे तीन टप्यात पंप आहेत. त्यातील पंप नादुरुस्त झाले. ते दुरुस्त करून आणले आहेत. बुधवारपासून पाणी सुरळीत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- पांडुरंग पाटील, शाखा अभियंता