अलिबाग नाट्यगृहाचे स्वप्न धुळीला
By Admin | Updated: March 8, 2016 02:01 IST2016-03-08T02:01:07+5:302016-03-08T02:01:07+5:30
नाट्यगृहासाठी अलिबागच्या नगर पालिकेकडे जागा उपलब्ध नाही, तसेच नाट्यगृहासाठी सरकारकडून प्राप्त होणारा सुमारे चार कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेण्यासाठीही पालिकेकडे २० लाख रुपये नाहीत

अलिबाग नाट्यगृहाचे स्वप्न धुळीला
अलिबाग : नाट्यगृहासाठी अलिबागच्या नगर पालिकेकडे जागा उपलब्ध नाही, तसेच नाट्यगृहासाठी सरकारकडून प्राप्त होणारा सुमारे चार कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेण्यासाठीही पालिकेकडे २० लाख रुपये नाहीत. त्यामुळे अलिबागकरांचे नाट्यगृहाचे स्वप्न आता पुरते धुळीला मिळाल्याची माहिती अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली.
अलिबाग हे जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुसज्ज नाट्यगृह असावे अशी प्रत्येक अलिबागकरांची इच्छा आहे. आज ना उद्या नाट्यगृह पालिकेमार्फत उभे राहील अशी भाबडी आशा अलिबागकरांना होती. अलिबागच्या नाट्यगृहासाठी नगर पालिकेने विकास आराखड्यामध्ये कोणतेच आरक्षण ठेवलेले नसल्याची धक्कादायक बाब मधुकर ठाकूर यांनी उघडकीस आणली आहे.१ जून २०१५ च्या अलिबाग नगर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ६२३ नुसार नाट्यगृहासाठी जागा नाही. तसेच २० लाख रुपयेही नगर पालिका उपलब्ध करु शकत नाही. नगर पालिका प्रकल्पात एकत्रित काम करु शकत नाही. पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ या नाट्यगृहाच्या बांधकामास अर्थसहाय्य देण्यासाठी ना हरकत दाखला द्यावा, असा ठराव घेण्यात आला आहे.
याच सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ६२१ नुसार अलिबाग नगर पालिकेच्या मालकीची सुमारे १२ गुंठे जागा स.नं.७/२, सी.स.नं.१३२४ ही जागा वाणिज्य कारणासाठी अलिबागच्या श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळाला तीन वर्षे भुईभाड्याने देण्याला संमती दिली आहे, या दोन्ही ठरावांकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले. नाट्यगृहासाठी जागा असताना ती सहकारी संस्थेला देण्याची गरज काय होती, असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला.