पनवेलमध्ये डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन
By Admin | Updated: March 16, 2017 03:17 IST2017-03-16T03:17:38+5:302017-03-16T03:17:38+5:30
धुळे येथील शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी जबर मारहाण केली. यात सदर डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

पनवेलमध्ये डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन
पनवेल : धुळे येथील शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी जबर मारहाण केली. यात सदर डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद वैद्यकीय क्षेत्रात उमटले आहेत. पनवेल परिसरातील डॉक्टर्सनी बुधवारी आपली रुग्णालये, दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. अशा घटनांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना आखाव्यात. तसेच डॉक्टर्सना सरंक्षण द्यावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या.
पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात पनवेलसह खारघर, कामोठे, कळंबोली परिसरातील पाचशेपेक्षा अधिक डॉक्टर्स सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ‘काम बंद’ आंदोलनात दवाखाने बंद ठेवण्यात आले असले, तरी अत्यावश्यक सेवा आणि रुग्णालयाचा कारभार नियमितपणे सुरू होता. त्यामुळे या बंदचा रुग्णांवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मागील काही महिन्यांपासून रुग्णांच्या नातेवाइकांडून डॉक्टर्सवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे डॉक्टर्सचे खच्चीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार थांबविण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत. तसेच डॉक्टर्सना संरक्षण द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा त्यांना यश येत नाही. एखादी दुर्दैवी घटना घडते.
अशा वेळी संबंधित डॉक्टरला जबाबदार धरणे योग्य नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व डॉक्टर असोसिएशनचे सदस्य रमेश पटेल यांनी या वेळी स्पष्ट केले.
पनवेल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिल परमार, डॉ. गिरीश गुणे, डॉ. नितीन तांबे आदींसह मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील डॉक्टर्सनी या ‘काम बंद’ आंदोलनात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)