एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:00 IST2020-10-09T00:00:38+5:302020-10-09T00:00:42+5:30

आयुक्तांचे शाळा व्यवस्थापनांना आदेश; फीसाठी अडवणूक न करण्याच्या सूचना

Do not deprive any student of education | एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नका

एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नका

नवी मुंबई : शाळा व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांकडे फीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फीसाठी कोणाचीही अडवणूक केली जाऊ नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशा सूचना मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

नवी मुंबईमधील शाळा व्यवस्थापनांची बैठक आयुक्तांनी आयोजित केली होती. नवी मुंबई हे देशातील शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने आयुक्तांनी शाळा व्यवस्थापनांशी चर्चा केली. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाला आॅनलाइन शिक्षण मिळणे आवश्यक आहे. काही ठिकाणी फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत. फीसाठी तगादा लावला जात आहे. कर्ज घेऊन फी भरा, असा सल्ला दिला जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या घटना शहरात होऊ नयेत. शिक्षण हक्क कायद्याचे भान सर्वांनी राखणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेने पाठविलेल्या नोटिशीची गांभीर्याने दखल घ्यावी, वारंवार नियमांचे उल्लंघन सुरूच राहिले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेची गरज आहे. त्याच पद्धतीने शाळेलाही विद्यार्थ्यांची गरज आहे. व्यवस्थापनाने पालकांशी संवाद साधला पाहिजे. परस्परांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. व्यवस्थापनाच्या अडचणीही समजून घेण्यात आल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शिक्षण उपआयुक्त योेगेश कडुस्कर उपस्थित होते.

मांडल्या समस्या
लॉकडाऊनच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन, सुरक्षा, सफाई व्यवस्थेवर होणारा खर्च, वीजदेयके व पाणीदेयकांमध्ये न मिळालेली सूट या अडचणीही महानगरपालिका आयुक्तांसमोर शाळा व्यवस्थापनाकडून मांडण्यात आल्या.

Web Title: Do not deprive any student of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.