पाच दूध कंपन्यांवर वितरकांचा बहिष्कार!
By Admin | Updated: April 28, 2015 02:04 IST2015-04-28T02:04:35+5:302015-04-28T02:04:35+5:30
अपुऱ्या कमिशनचे कारण देत मुंबई महानगरातील दूध विक्रेत्यांनी अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद आणि वारणा या पाच नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दूध विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पाच दूध कंपन्यांवर वितरकांचा बहिष्कार!
चेतन ननावरे - मुंबई
अपुऱ्या कमिशनचे कारण देत मुंबई महानगरातील दूध विक्रेत्यांनी अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद आणि वारणा या पाच नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दूध विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी सकाळी घरपोच होणाऱ्या वितरणासाठी काही प्रमाणात दूध खरेदी सुरू आहे. मात्र १ मेपर्यंत कमिशनवाढीच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, तर पाचही कंपन्यांच्या संपूर्ण दूध विक्रीवर बहिष्कार टाकणार असल्याचे मुंबई दूध विक्रेता संघाचे जगदीश कट्टीमणी यांनी सांगितले.
पुरेसे कमिशन मिळत नसल्याने दूध विक्रेते स्टॉल आणि दुकानांवर दूध थंड करण्यासाठी एमआरपीहून चढ्या किमतीने दुधाची विक्री करीत होते. मुंबईसह सर्वच शहरांत गेल्या काही वर्षांपासून अशाच प्रकारे दूध विक्री सुरू आहे. मात्र त्याची तक्रार कशी व कोणाकडे करायची, या प्रश्नाने हवालदिल ग्राहक निमूटपणे एमआरपीहून अधिक किमतीने दूध खरेदी करीत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून वैधमापनशास्त्र विभागाने एमआरपीहून चढ्या किमतीने दूध विक्री करणाऱ्या ३०० हून अधिक दुकानदारांवर खटले भरले. त्यांमध्ये दूधविक्रेत्यांसोबत दूध कंपन्यांनाही सामील करून घेण्यात आले आहे. योग्य कमिशन मिळत नसल्याने विक्रेत्यांना स्टॉल आणि दुकानांत वाढीव किमतीने दूध विक्री करावी लागत असल्याची कबुली कट्टीमणी यांनी दिली. ते म्हणाले की दूध विक्रेत्यांनी यापूर्वी विविध दूध कंपन्यांकडे कमिशनवाढीची मागणी केली आहे, मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एमआरपीहून अधिक किमतीने दूध विक्री करावी लागत आहे. मात्र प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईनंतर दूध कंपन्यांसोबत चर्चा केल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. परिणामी संघटनेने अपुरे कमिशन देणाऱ्या कंपन्यांच्या दूध खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गाईच्या दुधामागे किती कमिशन
कंपनीकमिशनटक्के
अमूल१.२५३.२९
मदर डेअरी१.२५३.२९
गोकूळ१.४५३.८१
महानंद१.५०३.९४
वारणा२.५०६.२५
म्हशीच्या दुधामागे मिळणारे कमिशन
कंपनी किंमतकमिशनटक्के
अमूल५०१.४५२.९०
मदर डेअरी४८१.५०३.१२
गोकूळ५०१.४५३.१२
वारणा४८१.५०४.९०
इतर नामांकित कंपन्यांकडून पुरेसे कमिशन मिळत असल्याने बहिष्कार टाकलेल्या कंपन्यांच्या दुधाला त्यांचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. पर्यायी दुधामध्ये आरे, कृष्णा, नवनाथ, नरेन, गोविंद अशा दूध कंपन्यांना पसंती असल्याने त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.
अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद या कंपन्यांच्या दुधाची प्रति लीटर एमआरपी किंमत ३८ रुपये, तर वारणाची प्रति लीटर किंमत ४० रुपये आहे. मात्र इतर कंपन्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी वारणाही ३८ रुपये दराने विकावे लागते. त्यामुळे वारणाची विक्री करताना केवळ ५० पैसे कमिशन मिळते.
गैरसोय नाही
पाच कंपन्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार टाकल्यानंतरही ग्राहकांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाने दिले आहे. इतर नामांकित दूध कंपन्यांच्या दुधाची विक्री करून ग्राहकांना दुधाचा पुरवठा केला जाणार आहे.