एमआयडीसीविरोधात असंतोष

By Admin | Updated: October 1, 2015 02:06 IST2015-10-01T02:06:19+5:302015-10-01T02:06:19+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Dissatisfaction with MIDC | एमआयडीसीविरोधात असंतोष

एमआयडीसीविरोधात असंतोष

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु या कारवाईच्या विरोधात रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला. हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही दुकानांच्या गाळ्यावर कारवाईची औपचारिकता करून एमआयडीसीच्या पथकाला माघारी फिरावे लागले. असे असले तरी सोमवारपासून पुन्हा कारवाई गतिमान करणार असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांच्या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यातील बहुतांशी इमारती एमआयडीसीच्या जमिनीवर आहेत. त्यामुळे एमआयडीसीने या बांधकामांना एमआरपी अ‍ॅक्टनुसार नोटिसा बजावून मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी बिंदूमाधव नगरमधील बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली. तर आज दिघा परिसरातील तीन निवासी इमारतींवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासूनच या विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र या कारवाईच्या विरोधात हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आयुष्यभराची कमाई खर्ची घालून आम्ही या इमारतीत घरे घेतली. त्यावर आता कारवाई होणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. आम्हाला बेघर करण्यापेक्षा या इमारती बांधणारे विकासक, त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापालिकेचे अधिकारी, वीज पुरवठा देणारे महावितरणचे संबंधित अधिकारी व बघ्याची भूमिका घेणारे पोलीस यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी यावेळी लावून धरली. दरम्यान, रहिवाशांच्या विरोधामुळे सकाळी ९.३0 ते दुपारी २.३0 वाजेपर्यंत एमआयडीसीच्या पथकाला कोणतीही कारवाई करता आली नाही. शेवटी न्यायलयाच्या आदेशानुसार ही कारवाई अपरिहार्य असल्याचे एमआरडीसी व पोलीस अधिकाऱ्यांनी रहिवाशांना समजावून सांगितले. त्यामुळे दुपारनंतर त्यांचा विरोध काहीसा मावळल्याने तीन वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. असे असले तरी आज केवळ इमारतीतील काही वाणिज्य गाळे व एका हॉटेलच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिन्ही इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
--------------------
दिघ्यातील शिवराम सदन, पार्वती अपार्टमेंट व केरू प्लाझा या तीन अनधिकृत इमारतींवर आज कारवाई करण्यात येणार होती. त्यानुसार सकाळपासूनच या विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु रहिवाशांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घोषणाबाजी करीत रहिवाशांनी कारवाईला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. काही महिलांनी मार्गात गणपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवला होता. विरोध करणाऱ्यांत महिलांची संख्या लक्षणीय होती. समाजसेविका ऋता आव्हाड यांनी आज पुन्हा रहिवाशांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Dissatisfaction with MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.