शिवसेनेतील बंडखाेरांविरोधात बेलापूरमध्ये असंतोष, वाशी मध्यवर्ती कार्यालयातून शिंदेंचा फोटो काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 13:11 IST2022-06-27T13:10:21+5:302022-06-27T13:11:27+5:30
शनिवारी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यासह बडखोरांचा निषेध केला. वाशीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली.

शिवसेनेतील बंडखाेरांविरोधात बेलापूरमध्ये असंतोष, वाशी मध्यवर्ती कार्यालयातून शिंदेंचा फोटो काढला
नवी मुंबई : शिवसेनेतील बंडखोरांविरोधात बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे. मात्र शिंदे समर्थक पदाधिकाऱ्यांनीही मौन बाळगणे पसंत केले आहे.
शनिवारी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यासह बडखोरांचा निषेध केला. वाशीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. त्यानंतर मध्यवर्ती कार्यालयातील शिंदे यांचा फोटोही हटविला. नेरूळमध्येही पालकमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तर बेलापूरमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी ऐरोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. अद्याप कोणीही बंडखोरांचा निषेध केलेला नाही. जोपर्यंत शिंदे यांची हकालपट्टी होत नाही किंवा ते स्वत: अधिकृतपणे शिवसेना सोडत नाहीत, तोपर्यंत कोणाचाही निषेध किंवा समर्थन न करण्याची भूमिका घेतली आहे.
नवी मुंबईमधील शिवसेनेतही जुने निष्ठावंत व मागील सात वर्षांमध्ये पालकमंत्र्यांनी भाजप, राष्ट्रवादीतून फोडून आणलेल्यांचा गट आहे. पक्षातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांचा गट शांतच आहे. जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांची आंदोलनात गर्दी पाहावयास मिळाली. फायद्यासाठी पक्षात आलेले कसोटीच्या काळात बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीकाही पदाधिकारी करू लागले आहेत.
राज्यातील बंडखोरी म्हणजे भाजपने शिवसेनेसाठी लावलेला सापळा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषारी मैत्रीमुळे हे घडले आहे. पण या अडचणीच्या काळातही नवी मुंबईतील शिवसैनिक पक्ष प्रमुखांसोबतच राहणार आहेत.
- विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख, बेलापूर
आम्ही शिवसेनेबराेबरच आहोत. पक्षाच्या बैठकांमध्येही सहभाग घेत आहोत. बंडखोरीच्या सर्व हालचालींकडे लक्ष असून, पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम सुरू राहील.
- द्वारकानाथ भोईर,
जिल्हा प्रमुख, ऐरोली