सुविधांअभावी घणसोलीकरांचा सिडकोविरोधात असंतोष

By Admin | Updated: February 15, 2016 03:09 IST2016-02-15T03:09:27+5:302016-02-15T03:09:27+5:30

घणसोली कॉलनी परिसर अद्यापही महापालिकेला हस्तांतर झालेला नसल्याने तिथल्या रहिवाशांना विविध गैरसोयींना सामोर जावे लागत आहे.

Dissatisfaction with CIDCO against Ghansolikar due to lack of amenities | सुविधांअभावी घणसोलीकरांचा सिडकोविरोधात असंतोष

सुविधांअभावी घणसोलीकरांचा सिडकोविरोधात असंतोष

नवी मुंबई : घणसोली कॉलनी परिसर अद्यापही महापालिकेला हस्तांतर झालेला नसल्याने तिथल्या रहिवाशांना विविध गैरसोयींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांनी जनसंवाद उपक्रमादरम्यान तक्रारींच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त केला. यावेळी वीज वितरण व रस्त्यांबाबतच्या तक्रारींची संख्या अधिक होती.
सिडकोने घणसोली कॉलनी विभाग अद्याप महापालिकेला हस्तांतर केलेला नाही. नव्याने विकसित होत असलेल्या या विभागातील रहिवाशांकडून सुविधांच्या नावाखाली कर घेतला जात असताना
पुरेशा सुविधा मात्र मिळत नाहीत. परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली असल्याने अवघ्या १० वर्षांतच तिथले रस्ते रहदारीला अपुरे पडत आहेत.
रहदारी वाढलेली असताना दुतर्फा होणारी पार्किंग तिथली मोठी समस्या ठरत आहे. तर पदपथांवर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या दमदाटीला पादचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. विभागात रस्ते आहेत मात्र महानगर गॅस, विद्युत विभाग यांच्याकडून वारंवार खोदकामे होत आहेत. त्यानंतर रस्ते बुजवताना समानता व दर्जा राखला जात नसल्याने पडलेले खड्डे
चुकवत चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. तर सेक्टर १५-१६ परिसरात लोकवस्ती वाढलेली असतानाही अद्याप त्या ठिकाणी चांगल्या रस्त्यांची निर्मिती झालेली नाही. याचा परिवहन सेवेवरही परिणाम होत आहे. या भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार तरी कोण, असा प्रश्नही रहिवाशांना सतावत आहे. सिडको व महापालिकेच्या हस्तांतर निर्णयात होणाऱ्या विलंबामुळे विभागातील सुविधा रखडल्या
आहेत.
सेक्टर १ व ७ परिसरात असलेल्या दोन नाल्यांमधून वाहणाऱ्या दूषित पाण्यापासून पसरणारी दुर्गंधी त्रासदायक ठरत आहे. शिवाय त्या ठिकाणच्या डासांमुळे नागरी आरोग्याचाही गंभीर प्रश्न सतावत आहे. खेळाची मैदाने, विरंगुळ्यासाठी उद्याने नसल्याने लहान मुलांसह ज्येष्ठांचीही गैरसोय होत आहे. नागरिकांच्या या विविध समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने आमदार संदीप नाईक यांनी जनसंवादाचे आयोजन केले होते. त्यामध्ये नागरिकांनी होणाऱ्या गैरसोयी मांडत सिडकोविरोधातला असंतोष व्यक्त केला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सिडको, पालिका, वीज वितरण, पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी सिडकोच्या विरोधातील होत्या. त्या निकाली काढण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Dissatisfaction with CIDCO against Ghansolikar due to lack of amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.