नळजोडण्या खंडित केल्याने असंतोष
By Admin | Updated: May 15, 2016 04:06 IST2016-05-15T04:06:16+5:302016-05-15T04:06:16+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तुर्भे नाका हनुमान नगरमधील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. नागरिकांचे पाणी बंद करून ते गटारात सोडून दिले आहे.

नळजोडण्या खंडित केल्याने असंतोष
नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तुर्भे नाका हनुमान नगरमधील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. नागरिकांचे पाणी बंद करून ते गटारात सोडून दिले आहे. मागणी करूनही अधिकृत नळजोडणी न दिल्यामुळे व अचानक पाणी थांबविल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाने एक आठवड्यापासून अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई सुरू केली आहे. जवळपास ५०० नळजोडण्या खंडित केल्या आहेत. शुक्रवारी तुर्भे नाका येथील हनुमान नगरमध्ये कारवाई करण्यात आले. नागरिकांचा पाणीपुरवठाच खंडित करण्यात आला. नागरिकांनी विनंती केल्यानंतरही प्रशासनाने काहीही ऐकले नाही. आयुक्तांचे आदेश आहेत, यामुळे आता अधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांनाच पाणी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात ३०० पेक्षा जास्त नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाने कारवाई करून नागरिकांच्या घरामध्ये जाणारे पाणी गटारामध्ये सोडून दिले आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. आम्हाला पिण्यासाठी पाणी देत नाही व दुसरीकडे गटारात पाणी जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
हनुमान नगरमधील अनेक नागरिकांनी २०१३ मध्येच महापालिकेकडे अधिकृत नळजोडणी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. आवश्यक कागदपत्रे व पालिकेचे शुल्कही भरले आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पाणीपुरवठा विभागात फेऱ्या मारूनही अधिकृतपणे नळ दिलेला नाही. पालिकेचे कर्मचारी वारंवार हेलपाटे मारावे लावत होते. तुम्हाला पाणी मिळत आहे, मग विनाकारण विलंब का करता, अशी उत्तरे दिली जात होती. पैसे भरून पाणी दिले नाही व आता अधिकृत नळ घेतला नसल्याचे कारण सांगून मे महिन्यात पाणीपुरवठा थांबविल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गरिबांना पाण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये. ज्यांनी वेळेत नळजोडण्या दिल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.