सेंट्रल पार्कच्या दुरवस्थेविषयी असंतोष

By Admin | Updated: February 11, 2016 02:50 IST2016-02-11T02:50:23+5:302016-02-11T02:50:23+5:30

सिडकोने चाळीस वर्षांत उभारलेल्या पहिल्या भव्य उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या विषयी नागरिकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. श्रीमंतांचा खेळ असणाऱ्या गोल्फ

Discontent about the disturbance of Central Park | सेंट्रल पार्कच्या दुरवस्थेविषयी असंतोष

सेंट्रल पार्कच्या दुरवस्थेविषयी असंतोष

पनवेल : सिडकोने चाळीस वर्षांत उभारलेल्या पहिल्या भव्य उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या विषयी नागरिकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. श्रीमंतांचा खेळ असणाऱ्या गोल्फ कोर्सची निगा राखली जाते, परंतु नागरिकांच्या विरंगुळ्याचा एकमेव पर्याय असलेल्या उद्यानाची देखभाल केली जात नसल्याबाबत तीव्र नाराजी, खारघर परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्कमधील ८४३ एकर जमिनीवर उभारलेले सेंट्रल पार्क व लंडनमधील हाईड पार्कप्रमाणे भव्य उद्यान उभारण्याची घोषणा सिडकोने केली होती. उद्यानाचा पहिला टप्पा २०१० मध्ये पूर्ण केला, परंतु सहा वर्षांत उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुलांसाठीची खेळणी वगळता उद्यानामध्ये पाहावे, असे काहीच नाही. सिडको प्रशासनाने करोडो रुपये वाया घालविले आहेत. ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविताच नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. रोज सकाळी व सायंकाळी शेकडो नागरिक जॉगिंगसाठी येतात. रोज सायंकाळी व शनिवार-रविवारीही खेळण्यासाठी हजारो नागरिक येथे येत असतात. सिडकोच्या संकेतस्थळावर व विकिपीडियावरही सेंट्रल पार्कचे डोळे दिपविणारे फोटो टाकले आहेत. यामुळे मुंबई, ठाणे व इतर ठिकाणांवरूनही नागरिक येत आहेत, परंतु उद्यानाची अवस्था पाहून सर्वांचीच निराशा होत आहे.
उद्यानामध्ये कारंजे बंद आहेत. त्यामधील साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती आहे. तलाव पूर्णपणे शैवालाने भरला आहे. म्युझिक उद्यानामध्ये पाहण्यासारखे काहीच नाही. पूर्ण उद्यानामध्ये चारही दिशांना फूडकोर्ट उभारले आहेत, परंतु सहा वर्षांत एकही फूडकोर्ट सुरू झालेले नाही, तसेच एकही पाणपोई सुरू नाही. पथदिवे बंद आहे.


सेंट्रल पार्क हे समस्यांनी ग्रासलेले उद्यान आहे. जॉगर्सला चालण्यासाठी असलेल्या ट्रॅकवरील अर्ध्या पार्कमधील विद्युत दिवे बंद आहेत. त्यामुळे अंधारामुळे संपूर्ण पार्कमध्ये फिरता येत नाही. ज्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुविधा आहेत व लोकांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, अशा ठिकाणचे हायमास्टचे दिवेदेखील बंद आहेत. सिडकोने केलेली घोषणा व वास्तवात जमिन आसमानचा फरक आहे.
- सुधाकर तोडेकर, खारघर सेक्टर १०

‘लोकमत’ने छापलेल्या बातमीमुळे सिडकोच्या कामांचे धिंडवडे निघाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणून त्याचा गवगवा करणाऱ्या सिडको प्रशासनाला यामुळे नक्कीच जाग येईल. उद्यानाला भेट देण्याऱ्या नागरिकांची येथील परिस्थिती पाहिल्यावर घोर निराशा होते. त्यामुळे सिडकोने याबाबत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. - सुनील म्हसकर, खारघर सेक्टर ५

सेंट्रल पार्कची निर्मिती सिडकोने अतिशय सुंदर केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षेचा अभाव आहे. संध्याकाळच्या वेळेला अनेक वेळा पथदिवे बंद असल्यामुळे, या ठिकाणी अंधार पसरतो. त्यामुळे या गोष्टीचा फायदा लुटारू घेऊ शकतात.
- प्रकाश मिरकुटे , ज्येष्ठ नागरिक सेक्टर २

सिडकोने उभारलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अशी दुरवस्था झालेली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागला गेला आहे. दुसरा टप्पा तयार होण्यापूर्वीच, पहिल्या टप्प्याची अशी अवस्था झाली असेल, तर मग याबाबत जबाबदार कोण? हा प्रकल्प सुरू झाल्यापासून या ठिकाणी विविध समस्या भेडसावत आहेत, त्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे.
- ज्ञानदेव म्हात्रे, खारघर गाव

सेंट्रल पार्कमध्ये सुट्टीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. हे पर्यटक आपल्यासोबत खाद्यपदार्थ घेऊन येतात आणि काही वेळा हे खाद्यपदार्थ त्याच ठिकाणी टाकले जातात. खाद्यपदार्थ सोबत घेऊन येण्यास बंदी असूनदेखील असे प्रकार घडतात.
- नेत्रा पाटील, खारघर, सेक्टर २१

करोडो रु पये खर्च करून सिडकोने सेंट्रल पार्कउभारले आहे. मात्र, या ठिकाणावर आल्यानंतर हा सर्व पैसा खर्च करून सिडकोने केवळ शो बाजी केली आहे, असेच चित्र आहे. एकाही ठिकाणाची योग्य निगा सिडकोमार्फत ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे सिडकोमार्फत यासाठी नव्याने प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. - गणपत सुर्वे, खारघर सेक्टर ८

Web Title: Discontent about the disturbance of Central Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.