दीपोत्सव जल्लोषात, खरेदीला उधाण, लक्ष्मीपूजनानिमित्त कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:39 IST2017-10-20T06:39:31+5:302017-10-20T06:39:45+5:30
लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, तसेच पणत्यांनी शहर उजळून निघाले. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी पहाट, पणती उत्सव, रांगोळी स्पर्धा, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

दीपोत्सव जल्लोषात, खरेदीला उधाण, लक्ष्मीपूजनानिमित्त कोटींची उलाढाल
नवी मुंबई : लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, तसेच पणत्यांनी शहर उजळून निघाले. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी पहाट, पणती उत्सव, रांगोळी स्पर्धा, धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. नवीन कपडे, पूजेचे साहित्य, मिठाई खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
लक्ष्मीपूजनानिमित्त व्यावसायिकांनी विविध सवलतींचा ग्राहकांवर भडिमार केला असून बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. घराघरात तसेच व्यावसायिक, दुकानदार, औद्योगिक वसाहतींमध्ये लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे करण्यात आले.
बाजारात उपलब्ध असलेल्या शाडूमातीच्या लहान आकारातील लक्ष्मीच्या आकर्षक मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती. प्रामुख्याने व्यापाºयांकडून या मूर्तीला प्राधान्य देण्यात आले. यासाठी भरीव व पोकळ या प्रकारात सराफ व्यावसायिकांकडून पूजा उपकरणांसह चांदीच्या तसेच चांदीचा वा सोन्याचा मुलामा असलेल्या लहान-मोठ्या आकारातील लक्ष्मीच्या मूर्तीही बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होत्या. यात महालक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी असे विविध प्रकारही आहेत. लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी, पूजेसाठी आवश्यक बत्तासे, लाह्यांना विशेष मागणी होती. शहरातील मंदिर परिसर, दुकाने, मॉल्समध्ये आकर्षक रोषणाई करून सजविण्यात आले होते.
आॅफर्सची धमाल
व्यावसायिकांकडून या दिवसाचे सोने करून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट फोन, फर्निचर, मोबाइल, वस्त्रे आदी वस्तूंवर ३० ते ५० टक्के दराने आकर्षक सवलतींसह खास भेटवस्तूंचे नियोजन करण्यात आले होते. सराफ व्यावसायिकांनी मजुरीवर सूटसह आकर्षक भेटवस्तूची आॅफर देऊ केल्याने महिला वर्गाने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली.
खासगी नोकरदारवर्गाला सलग तीन दिवस लागून सुट्या मिळाल्याने दोन-तीन दिवसांच्या सुटीत पर्यटन स्थळाला भेट देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. नवीन वर्षात व्यापाराचा संपूर्ण हिशोब नव्या वहीत मांडण्याची सुरुवात व्यापारी करतात. चोपडी पूजनासाठी लक्ष्मीचे चित्र असलेल्या वह्या खरेदीसाठी वाशीतील एपीएमसी बाजारात व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पणती उत्सव
सीबीडी सेक्टर ८ परिसरातील गणेश नगर क्रीडांगण परिसरात भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी किल्ला महोत्सव व स्पर्धा, बच्चेकंपनीकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, कंदील तयार करणे याचा समावेश होता.
कार्यक्रमाला प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांची विशेष उपस्थिती होती. या ठिकाणी संपूर्ण परिसर दिव्यांनी सजवून संध्याकाळी पणती उत्सव साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिक या भव्य दीपोत्सवात सहभागी झाले होते.
संगणक युगातही खातेवही
संगणकाच्या युगातही दुकानात खातेवहीची खरेदी करत त्याची पूजा करण्यात आली. यात पूजेसाठी लागणाºया खाते वही, तारखेचा गठ्ठा, लक्ष्मी फोटो या साहित्य खरेदीकरिता ग्राहकांनी गर्दी केली होती. पूजेचा मान असल्याने विक्रीवर कसलाही परिणाम नसल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.
बहिरीदेवाची यात्रा उत्साहात
दिवाळे गावातील बहिरीदेवाची यात्रा उत्साहात पार पडली. बुधवारी समुद्रामधून देवाची मूर्ती शोधून गावात आणली होती. गुरुवारी गावामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यात्रेसाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थित राहिले होते. शुक्रवारी पुन्हा देवाची मूर्ती समुद्रामध्ये जिथे सापडली तिथेच सोडली जाणार आहे.
एपीएमसीमध्ये सामुदायिक चोपडी पूजन
१दिवाळीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भाजी मार्केटमध्ये सामुदायिक चोपडी पूजनाचे आयोजन केले होते. एपीएमसीमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. वर्षभर किरकोळ विक्रेत्यांबरोबर उधारी व्यवहार सुरू असतो.
२दिवाळीनिमित्त सर्व उधारी दिली जात असल्याने मार्केटमध्ये खºया अर्थाने लक्ष्मी आल्याचे वातावरण होते. कोट्यवधींची उलाढाल यानिमित्ताने होते. कांदा-बटाटा, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्येही चोपडी पूजन करण्यात आले. भाजी मार्केटमध्ये माजी संचालक शंकर पिंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.