मनुष्यबळाअभावी मदतकार्यात अडचणी; प्रशासनासह सत्ताधारी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:34 AM2019-07-23T00:34:16+5:302019-07-23T00:34:24+5:30

आठ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असतानाही चारच केंद्र कार्यरत

Difficulties in assisting in the lack of manpower; | मनुष्यबळाअभावी मदतकार्यात अडचणी; प्रशासनासह सत्ताधारी उदासीन

मनुष्यबळाअभावी मदतकार्यात अडचणी; प्रशासनासह सत्ताधारी उदासीन

Next

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : अपुऱ्या मनुष्यबळामुळे आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन यंत्रणा कमकुवत ठरत आहे. रविवारी नेरुळ परिसरात एकाच वेळी दोन घटना घडल्याने हा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. आकृतिबंधानुसार महापालिका क्षेत्रात ८ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असतानाही सध्या केवळ चार केंद्र कार्यान्वित असून त्याठिकाणीही पुरेसे मनुष्यबळ व साधने नसल्याने हा प्रसंग ओढावत आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास नेरुळ परिसरात काही अंतराने व्यक्ती तलावात बुडाल्याची तसेच इमारतीमध्ये आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. यावेळी तलावात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधकार्यात नेरुळ व वाशी अग्निशमन दलाचे जवान व्यस्त होते. त्यामुळे जुईनगर येथे लागलेली आग विझवण्याचा कॉल नेरुळवरून सीबीडी व तिथून वाशीच्या अग्निशमन केंद्राला गेला. परिणामी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोचण्यास उशीर झाला. यावेळी नागरिकांनी कार्यतत्परता दाखवून आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र भविष्यात अशाच प्रकारे दोन मोठ्या दुर्घटना घडल्यास पालिकेची अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे दोन वर्षापूर्वी पालिकेने तयार केलेल्या आकृतिबंधानुसार महापालिका क्षेत्रात ८ अग्निशमन केंद्रे व त्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. शहराच्या ११० स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रफळापैकी सुमारे ८४ स्क्वेअर किलोमीटरचे क्षेत्र महापालिकेचे येते, तर उर्वरित क्षेत्र औद्योगिक पट्ट्यात आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात प्रत्येकी साडेदहा स्क्वेअर किलोमीटरला एक अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या चार केंद्र कार्यान्वित असून कोपरखैरणेतील पाचवे केंद्र तयार असूनही वापराविना पडून आहे. त्यामागे मनुष्यबळ व यंत्रणेच्या कमतरतेचे कारण समोर येत आहे. तर नेरुळ येथील अग्निशमन केंद्रात बहुतांश वेळा केवळ दोनच कर्मचारी उपलब्ध असतात. हे दोन्ही कर्मचारी रविवारी तलावात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधकार्यात असल्याने त्याच परिसरातील आगीच्या ठिकाणी नेरुळचा बंब पोहचू शकला नाही.

मागील काही वर्षात शहराचा झपाट्याने विकास झाला असून अनेक नोडमध्ये गगनचुंबी इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. तर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या देखील १४ लाखांच्या घरात पोचली आहे. त्यामुळे महापालिकेची अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झालेली आहे, अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची वेळेवर मदत न मिळू शकल्याच्या कारणावरून मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. परंतु गरज असतानाही कर्मचारी भरतीकडे सत्ताधारी व प्रशासन यांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे सध्या उपलब्ध १३४ कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यांना ८ तासांऐवजी १६ तासांची ड्युटी करावी लागत आहे, तर नव्याने भरती करण्यात आलेल्या १७० कर्मचाºयांच्या नियुक्तीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून, सोमवारपासून या कामाला गती देण्यात आली आहे.

अपुरे अग्निशमन केंद्र
आकृतिबंधानुसार महापालिका क्षेत्रात ८ अग्निशमन केंद्रे आवश्यक आहेत, परंतु सध्या केवळ चार केंद्र कार्यरत असून त्याठिकाणीही अपुरे मनुष्यबळ आहे. तर पाचव्या केंद्राची कोपरखैरणेत इमारत उभी असतानाही गेली वर्षभर मनुष्यबळ तसेच साधनांअभावी तिचा वापर होऊ शकलेला नाही. त्यामुळे घणसोली, कोपरखैरणे परिसरात आगीची दुर्घटना किंवा आपत्कालीन प्रसंग घडल्यास वाशी किंवा ऐरोलीच्या केंद्रातून मदत मिळण्यास विलंब होत आहे.

Web Title: Difficulties in assisting in the lack of manpower;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.