महापालिकेमुळे पनवेलचा विकास!
By Admin | Updated: May 31, 2016 03:24 IST2016-05-31T03:24:04+5:302016-05-31T03:24:04+5:30
महानगरपालिकेमुळे प्रस्तावित विमानतळाप्रमाणे पनवेल तालुक्याच्या विकासाचेही उड्डाण होणार आहे. १७९ चौरस किलोमीटर परिसरातील नगरपालिका, सिडको कार्यक्षेत्र व ६८ गावांचा समावेश आहे

महापालिकेमुळे पनवेलचा विकास!
नामदेव मोरे, नवी मुंबई
महानगरपालिकेमुळे प्रस्तावित विमानतळाप्रमाणे पनवेल तालुक्याच्या विकासाचेही उड्डाण होणार आहे. १७९ चौरस किलोमीटर परिसरातील नगरपालिका, सिडको कार्यक्षेत्र व ६८ गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये या परिसरामध्ये ८३ कोटी ९८ लाख रूपये मालमत्ता व इतर कर उपलब्ध होत असून महापालिका अस्तित्वात आल्यानंतर हे उत्पन्न कित्येक पटीने वाढणार आहे.
राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेल शहर व तालुक्यातील गावे एकत्रित करून महापालिका बनविण्यात यावी, अशी मागणी १९९१ मध्ये सर्वप्रथम करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर महापालिकेचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होत आहे. पनवेल परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व प्रस्तावित महापालिका यामुळे विकासाचेही उड्डाण होणार आहे. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये नगरपालिका, गावांमध्ये ग्रामपंचायत, तालुक्यात जिल्हा परिषद, विकसित नोडमध्ये सिडको विकासकामे व कर संकलन करत आहे. निधीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे विकासाला गती येत नव्हती. महापालिकेमुळे सर्व निधी एका ठिकाणी संकलित होणार आहे. निधी उपलब्ध झाल्याने विकास कामेही वेगाने करणे शक्य होणार आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये ३३ कोटी ४२ लाख ६५,८८३ रूपये मालमत्ता व पाणीकर रूपाने उपलब्ध होत आहेत. सिडको कार्यक्षेत्रामधील २१ गावांमध्ये ३१ कोटी ४० लाख ५९ हजार ४१६ रूपये कर वसूल होणार आहे. नैना परिसरातील ३६ गावांमध्ये १५ कोटी ३९ लाख रूपये कर वसूल होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या ११ गावांचे उत्पन्न ३ कोटी ७६ लाख ५७७३ रूपये उत्पन्न मिळत आहे.
महापालिका क्षेत्रातील सर्व गावे व नगरपालिकेमध्ये ८३ कोटी ९८ लाख रूपये कर वसूल होत आहे. महापालिका क्षेत्रातील सद्यस्थितीमध्ये सर्वाधिक महसूल नगरपालिका क्षेत्रातील आहे. ६८ गावांपैकी खारघर व बेलपाडा परिसराचे उत्पन्न सर्वाधिक १३ कोटी २९ लाख रूपये आहे. नियोजनासाठी एकच प्राधिकरण येणार असल्यामुळे उत्पन्नाचे इतरही मार्ग उपलब्ध होणार आहेत.