नदीकिनाऱ्यावरही विकासकांचा डोळा
By Admin | Updated: May 15, 2016 04:10 IST2016-05-15T04:10:31+5:302016-05-15T04:10:31+5:30
नैना परिसरामधील २३ गावांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. पनवेल शहराला लागून असलेल्या या परिसरामधून गाढी नदीही धावते.

नदीकिनाऱ्यावरही विकासकांचा डोळा
नामदेव मोरे, नवी मुंबई
नैना परिसरामधील २३ गावांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. पनवेल शहराला लागून असलेल्या या परिसरामधून गाढी नदीही धावते. विकासाचे नियोजन करताना नदीचे पात्र व त्याच्या बाजूला पुरेशी मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. तत्काळ हद्द निश्चिती केली नाही तर पात्रामध्येही अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सिडको कार्यक्षेत्रामध्ये विकासासाठी अत्यंत कमी जमीन शिल्लक आहे. भविष्यात या परिसरामध्ये विमानतळ येणार असल्याने विकासासाठी प्रचंड संधी निर्माण होणार आहे. भविष्यात या परिसराला प्राप्त होणारे महत्त्व वेळेत लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी नैना प्रभावित क्षेत्रामधील हजारो एकर जमीन विकत घेतली आहे. काही मोठ्या उद्योजकांनी १०० ते ३०० एकर जमीनही खरेदी करून ठेवली आहे. १५ वर्षांपासून अनेकांनी या परिसरामध्ये इमारतींचे बांधकाम करण्यासही सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेऊन अनेकांनी प्रकल्प उभारले. काहींनी परवानगी न घेताच प्रकल्प उभे केले आहेत. जमिनीला सोन्याची किंमत आल्याने एक इंचही जागा विकासक फुकट सोडण्यास तयार नाहीत. देहरंग धरणापासून गाढी नदी नैना परिसरामधून खाडीमध्ये जाऊन मिळते. निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे नदीकिनाऱ्यावर इमारती किंवा टाऊनशिप उभारण्याचे नियोजन अनेक व्यावसायिकांनी केले आहे. नदीच्या परिसरामध्ये विकासकामांना परवानगी देण्यापूर्वी प्रथम नदीचे पात्र निश्चित करण्यात यावे. मुसळधार पावसाच्या वेळी नदीचे पाणी जिथपर्यंत असते त्यापासून काही मीटर अंतर सोडूनच परवानगी देणे आवश्यक आहे. परंतु अद्याप याविषयी ठोस भूमिका दिसत नाही. यामुळे १० वर्षांत नदीच्या पात्राला लागूनच मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. भविष्यात २६ जुलै २००५ प्रमाणे अतिवृष्टी झाल्यास हा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
नैना परिसरातील पहिल्या टप्प्यामधील आकुर्ली, बोर्ले, चिपले, कोप्रोली, पळस्पे, पालीदेवद, उसर्ली खुर्द, विचुंबे, विहीघर या गावांमधील जमीन नदीच्या किनारी आहे. याशिवाय देहरंग धरणापर्यंत असणाऱ्या गावांमध्येही बांधकाम व्यावसायिकांनी जमीन खरेदी करून ठेवली आहे. पनवेलमधील वडघर, विचुंबे, सुकापूर या परिसरामध्ये नदीच्या काठावर बांधकामे झाली आहेत. काठाला लागून व काही ठिकाणी नदीपात्राशेजारी संरक्षण भिंत बांधून बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. १० वर्षात सातत्याने नदीच्या बाजूला गृहप्रकल्प उभारले जात आहेत.