ताई-दादांच्या भांडणात रखडली विकासकामे
By Admin | Updated: December 29, 2015 00:38 IST2015-12-29T00:38:54+5:302015-12-29T00:38:54+5:30
महापालिकेची निवडणूक होऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या प्रभाग समितीच्या रचनेस

ताई-दादांच्या भांडणात रखडली विकासकामे
नवी मुंबई : महापालिकेची निवडणूक होऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या प्रभाग समितीच्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे सर्वच प्रभागांमधील विकासकामे ठप्प झाली असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. राष्ट्रवादी काँगे्रसने सत्ता टिकविण्यासाठी व शिवसेना, भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी शहरवासीयांना भरपूर आश्वासने दिली. १११ पैकी ७२ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवक काम करीत नसल्यामुळे नागरिकांनी परिवर्तन घडविले आहे. प्रत्येकानेच मतदारांना भरपूर आश्वासने दिली आहेत. महापालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये नगरसेवकांनी १०० पेक्षा जास्त ठराव मांडले होते. प्रत्येक सभेमध्ये विकासाचे नवीन प्रस्ताव मांडले जात आहेत, परंतु निवडणुका होऊन आठ महिने झाल्यानंतरही अद्याप एकही महत्त्वाचे काम मार्गी लागलेले नाही. प्रभाग समित्यांच्या रचनाही होऊ शकलेल्या नाहीत. २० आॅगस्टला झालेल्या तहकूब सभेमध्ये तातडीचा विषय म्हणून प्रभाग समित्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीला सोयीस्कर होईल, अशाप्रकारची रचना करण्यात आली होती. बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विरोधकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी शासनाकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या प्रस्तावास स्थगिती दिली. तेव्हापासून अद्याप स्थगिती उठविण्यात आलेली नाही. सत्ताधारी व विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु या राजकीय कुरघोडीचा फटका शहरातील विकासकामांना बसू लागला आहे.
प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला १० लाख निधी व प्रभाग समितीला ४० लाखांचा निधी मिळत असतो. या निधीमधून प्रभागामधील छोटी कामे केली जातात. गटर दुरुस्ती, नाल्यावरील झाकणे बसविणे, रस्ता दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे करता येतात. प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या ते नगरसेवकांना सांगत असतात. सदर कामे तत्काळ करणे शक्य होत असते. परंतु प्रभाग समित्यांची रचनाच झाली नसल्यामुळे वर्षभरामध्ये एकही काम होऊ शकले नाही. अनुभवी ज्येष्ठ नगरसेवक व ज्यांना राजकीय वरदहस्त आहे अशांची कामे तत्काळ होत आहेत; परंतु नवीन नगरसेवकांना मात्र नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. ताई - दादांच्या भांडणामध्ये आमच्या प्रभागाचे नुकसान होत असल्याच्या प्रतिक्रिया नगरसेवक व्यक्त करीत आहेत. नवीन वर्षात तत्काळ समित्या गठीत झाल्या नाहीत तर आर्थिक वर्षातील निधी तसाच पडून राहणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. परंतु नेत्यांच्या भांडणामुळे पाहात बसण्याशिवाय दुसरा मार्गच राहिलेला नाही. (प्रतिनिधी)
२०१५ या वर्षामध्ये प्रभाग समित्यांची रचना झाली नसल्यामुळे सर्वच नगरसेवकांना अपेक्षित विकासकामे करता आली नाहीत. राष्ट्रवादीने दोन प्रभाग समित्या हातातून जाऊ नयेत यासाठी रचना मनाप्रमाणे केल्या होत्या. प्रभाग समितीसारखा महत्त्वाचा विषय तातडीचे कामकाज म्हणून सादर केला होता. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली; परंतु स्थगीती हा उपाय नाही. पुन्हा फेररचना करण्याचे आदेश दिले असते तर वर्षभरामध्ये सर्वच नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात चांगली कामे करता आली असती.
सर्वसाधारण सभेतही उत्तर नाही
राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी प्रभाग समितीची निवड का झालेली नाही, रचनेस कोणी स्थगिती दिली, प्रभाग समित्यांच्या फेररचना कधी होणार, याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्तांनी याविषयी सभागृहातच लेखी उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु महासभेमध्ये या प्रश्नावर उत्तरच देण्यात आले नव्हते. यामुळे प्रभाग समित्या कधी स्थापन होणार, याविषयीचा संभ्रम अजून वाढला आहे.