‘बेटी बचाओ’ चा निर्धार

By Admin | Updated: March 8, 2016 02:14 IST2016-03-08T02:14:11+5:302016-03-08T02:14:11+5:30

महिलांचा कमी जन्मदर असणाऱ्या शहरांमध्ये पनवेलच्या सिडको कार्यक्षेत्राचा देशात ८ वा क्रमांक आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे.

Determination of 'Beti Bachao' | ‘बेटी बचाओ’ चा निर्धार

‘बेटी बचाओ’ चा निर्धार

नामदेव मोरे,  नवी मुंबई
महिलांचा कमी जन्मदर असणाऱ्या शहरांमध्ये पनवेलच्या सिडको कार्यक्षेत्राचा देशात ८ वा क्रमांक आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. यामुळे महिला दिनानिमित्त बेटी बचाओ मोहीम राबविण्याचा निर्धार लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून जनजागृतीसाठी कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा घरोघरी पोहचविली जाणार आहे.
देशातील सर्वात महत्त्वाचे शहर होण्याच्या दिशेने पनवेल तालुक्याची वाटचाल सुरू आहे. सिडकोने दक्षिण नवी मुंबई हे देशातील पहिले स्मार्ट शहर होणार असल्याची घोषणा केली आहे. शासनाने पनवेल महापालिका करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विमानतळ, नैना परिसरामुळे राज्यातील सर्वात जास्त गुुंतवणूक या परिसरात होत आहे. भौतिक प्रगती वाढत असली तरी तालुक्यामध्ये महिलांचा जन्मदर कमी होत असल्याचे धक्कादायक वास्तव जनगणनेतून समोर आले आहे. देशात सर्वात कमी जन्मदर असणाऱ्या शहरांमध्ये सिडको कार्यक्षेत्राचा ८ वा क्रमांक आहे. राज्यात दुसरा क्रमांक आहे. १ हजार पुरूषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या फक्त ८२० आहे. पूर्ण तालुक्यामध्ये हेच प्रमाण ८९३ आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ११२२ व सिंधुदुर्गमध्ये १०३६ एवढे महिलांचे प्रमाण आहे. देशात सर्वात जास्त महिलांचे प्रमाण असणाऱ्या जिल्ह्यांमध्येही रत्नागिरीचा समावेश आहे. कोकणामधील बहुतांश शहरामध्ये महिलांची संख्या जास्त असताना पनवेलसारख्या महानगरांमध्ये हे प्रमाण कमी असणे ही शोकांतिका असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सिडको कार्यक्षेत्राप्रमाणे तळोजा पाचनंदमध्ये ८६७, पालीदेवद ८७१, वडघर ८९५ काळुंदे्र परिसरात ८८५ एवढे कमी प्रमाण आहे. राज्यातील सरासरी जन्मदरापेक्षाही हे प्रमाण कमी आहे. पूर्ण राज्यामध्ये बेटी बचाओ मोहीम राबविली जात असताना पनवेल परिसरात मात्र अद्याप गांभीर्याने या समस्येकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
पनवेल तालुक्यामधील महिलांचा जन्मदर सुधारण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. वास्तविक पूर्ण तालुक्याचे शहरीकरण झाले आहे. परंतु या परिसरामध्ये योग्य आरोग्य यंत्रणाच नाही. या परिसरातील सोनोग्राफी सेंटर व गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्यासाठी कारवाई कोणी करायची हा प्रश्न आहे. राज्यभर प्रत्येक शहरामध्ये सोनोग्राफी सेंटरवर धाडी टाकल्या जात आहेत. परंतु पनवेल परिसरामध्ये मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. यामुळेच येथील मुलींचा जन्मदर कमी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. महिला दिनानिमित्त लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरामध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रत्येक गावनिहाय महिलांच्या जन्मदराचे प्रमाण याची यादी तयार करून त्यादृष्टीने जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. शहरामध्ये विद्यार्थ्यांची रॅली आयोजित केली जाणार आहे. होर्डिंग व इतर मार्गाने प्रत्येक नागरिकामध्ये बेटी बचाओचा संदेश पोहचविला जाणार आहे. पनवेल नगरपालिका बेटी बचाओ अभियान राबवत आहे. लवकरच नगरपारिषदेच्यावतीने एक मुलगी असणाऱ्या दांपत्याचा सत्कार केला जाणार आहे. पुढील वर्ष स्त्री सक्षमीकरण वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. महिलांसाठी जास्तीत जास्त शौचालय उभारण्यास अर्थसंकल्पात तरतूद केली
आहे.
- चारूशीला घरत,
नगराध्यक्षा, पनवेल पनवेल तालुक्यामध्ये कुठे गर्भलिंग चाचण्या होत असतील तर शासकीय व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तिथे कारवाई केली जाईल. याविषयी एक दबावगट तयार केला जाईल. शासनाची माझी कन्या भाग्यलक्ष्मी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. महिलांचा जन्मदर कमी असलेल्या परिसरामध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाईल. देशातील कर्तृत्ववान महिलांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- प्रशांत ठाकूर,
आमदार, पनवेल विधानसभा

Web Title: Determination of 'Beti Bachao'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.