हद्दपार गुन्हेगाराला तुर्भेतून अटक, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 2, 2023 15:44 IST2023-06-02T15:44:04+5:302023-06-02T15:44:17+5:30
तुर्भे आमआयडीसी पोलिसांनी एका हद्दपार गुन्हेगाराला अटक केली आहे.

हद्दपार गुन्हेगाराला तुर्भेतून अटक, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी मुंबई : तुर्भे आमआयडीसी पोलिसांनी एका हद्दपार गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याला दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही तो तुर्भे एमआयडीसी परिसरात आला होता. याची माहिती मिळताच गुरुवारी रात्री सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
तुर्भे स्टोअर परिसरात एक सराईत गुन्हेगार वावरत असून त्याला तडीपार केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संग्राम साबळे, पोलिस शिपाई राजेश उगाडे आदींचे पथक करण्यात आले होते. त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास तुर्भे स्टोअर परिसरात पाळत ठेवली होती. त्यामध्ये अविनाश राठोड (२९) हा संशयितरित्या वावरताना आढळून आला.
यामुळे त्याची चौकशी केली असता तो गुन्हेगार असून त्याला दोन वर्षासाठी हद्दपार केले असल्याची माहिती समोर आली. तर शिक्षेचा कालावधी शिल्लक असतानाही तो के.के. आर रोड येथील राहत्या घरी आला होता. याप्रकरणी त्याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.