डेंग्यू, मलेरियाचे थैमान
By Admin | Updated: September 9, 2015 00:10 IST2015-09-09T00:10:06+5:302015-09-09T00:10:06+5:30
शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने थैमान घातले आहे. महापालिकेसह सर्व खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. जवळपास चार जणांना जीव गमवावा लागला असताना

डेंग्यू, मलेरियाचे थैमान
- नामदेव मोरे, नवी मुंबई
शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने थैमान घातले आहे. महापालिकेसह सर्व खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. जवळपास चार जणांना जीव गमवावा लागला असताना महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणाची उपाययोजना देशात आदर्श असल्याचा दावा करीत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. शहरातील पाचपैकी दोन रुग्णालये पूर्णपणे बंद असून दोन फक्त नावापुरती सुरू आहेत. पूर्ण भार वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयावर पडला आहे. दोन महिन्यापासून शहरात डेंग्यू, मलेरियाची साथ गंभीर झाली आहे. सीवूडमध्ये एक महिन्यापूर्वी डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. नेरूळ सेक्टर १० मध्ये तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर घणसोलीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, यात उपआयुक्तांच्या नातेवाइकाचाही समावेश आहे.
शहरातील सर्व खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. आयसीयूमध्ये जागा शिल्लक नाही. अनेक रुग्णांना आयसीयू उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईला हलवावे लागत आहे. पालिकेच्या वाशी रुग्णालयात केसपेपर काढण्यासाठी लांबच - लांब रांगा लागत आहेत. पालिकेचे अनेक अधिकारी व नगरसेवकांच्या मुलांनाही डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यावर्षी तापाची साथ हाताबाहेर गेली असल्याची कबुली खाजगी रुग्णालयांमधील डॉक्टर देत आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही रुग्णांची संख्या वाढत असून पालिका उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याची तक्रार करण्यास सुरवात केली आहे. नुकतेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमाचे राष्ट्रीय सहसंचालक डॉ. एस. एन. शर्मा यांनी नवी मुंबई महापालिकेस भेट दिली होती. शहरातील साथरोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. महापालिकेने केलेल्या उपाययोजना, प्रचार व प्रसिद्धी प्रणाली देशातील इतर शहरांमध्ये राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. महापालिका प्रशासनाने आपली उपाययोजना आदर्श असल्याचा दावा केला आहे.
अधिकारी, नगरसेवकांना फटका
डेंग्यू व मलेरियाच्या साथीचा फटका महापालिकेच्या अधिकारी व नगरसेवकांनाही बसला आहे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या उपआयुक्तांच्या नातेवाइकाचा काही दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. सीवूडमध्ये पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या मुलांना व परिवारातील सदस्यांना डेंग्यू झाला होता. पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी साथ गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. प्लेटलेट्स १० हजारांवर आल्या होत्या. उपचारासाठी ४ लाख रुपये खर्च करावे लागले आहेत.
साथ नियंत्रणाबाबत महापालिकेचा दावा व वास्तव
दावा : डेंग्यू, मलेरियाची साथ नियंत्रणात
वास्तव : सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल
दावा : शहरात प्रभावी जनजागृती
वास्तव : साथ नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर जाग
दावा : औषध फवारणीचे प्रमाण वाढविले
वास्तव : फवारणी व्यवस्थित नसल्याची तक्रार
दावा : प्रचार प्रणाली देशभर राबविणार वास्तव : योग्य प्रचार करण्यात अपयश
दावा : साथीस जबाबदारांवर कारवाई
वास्तव : फक्त नोटीस देण्याची औपचारिकता
दावा : रुग्ण सापडल्यास बाजूच्या शंभर घरांची तपासणी
वास्तव : शंभर घरांची तपासणी व तेथे औषध फवारणी होत नाही
दावा : गप्पी मासे सोडले
वास्तव : गप्पी मासे सोडल्याचा दावा फोल
दावा : आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा वास्तव : शहरातील पाचपैकी फक्त वाशीतील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू
शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. साथ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेस अपयश आले असून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ९ सप्टेंबरच्या महासभेत लक्षवेधी मांडणार आहे.
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते
फवारणी, धुरीकरण वेळेवर होत नाही. माझ्या मुलीला ताप आल्याने रक्ताची तपासणी केली असता तिला डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय परिसरात डेंग्यू, मलेरियाच्या तापाने अनेक जण फणफणलेले आहेत.
- सतीश काटे, रहिवासी- कोपरखैरणे