टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन
By Admin | Updated: March 14, 2017 02:13 IST2017-03-14T02:13:32+5:302017-03-14T02:13:32+5:30
कर्जत तालुक्यातील हेदवली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य बनवले आहे

टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन
नेरळ : कर्जत तालुक्यातील हेदवली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य बनवले आहे. हे शैक्षणिक साहित्य शाळेच्या परिसरात लावण्यात आले आहे. या साहित्यामुळे शाळेला आगळेवेगळे रूप आले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल. शिक्षक बाळाराम गायकर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
कर्जतपासून २५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी हेदवली गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. सुमारे १४० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून सहा शिक्षक कार्यरत आहेत. येथील शिक्षक बाळाराम गायकर यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता टाकाऊ वस्तूंपासून टिकावू शैक्षणिक साहित्य बनविले आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाचे पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गायकर यांनी तेलाचे रिकामे डबे, लाकूड, पत्रे, अशा अनेक टाकाऊ वस्तूंना रंग आकार देऊन सूत्रांचे मंत्र, गणिताची उदाहरणे देणारे फलक, वाढदिवस दर्शविणारे फलक, माणुसकीची भिंत, विजेपासून धोका, शांतता राखा, अपंगांना मदत करा असे सुविचार लिहिलेले अनेक फलक तयार केले आहेत.
हेदवली शाळेतील शिक्षक हे नेहमीच विविध उपक्र म राबवत असून त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यास मदत होते. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असूनही गेली अनेक वर्षे येथे तीनच वर्गखोल्या असल्याने सातवीपर्यंतचे वर्ग तीन वर्गखोल्यांमध्ये भरवले जात आहेत. वर्गखोल्या वाढविण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, पत्रव्यवहार करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून आसन व्यवस्थेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन हेदवली शाळेतील वर्गखोल्या वाढविण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. (वार्ताहर)