नवरात्रासाठी रंगीबेरंगी घटांना मागणी

By Admin | Updated: October 13, 2015 01:40 IST2015-10-13T01:40:42+5:302015-10-13T01:40:42+5:30

नवरात्रोत्सवात लागणारे घट पूर्णत्वास गेले असून त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या फिती, एम्ब्रॉयडरीच्या फिती, टिकल्या,

Demand for colorful fall for Navratri | नवरात्रासाठी रंगीबेरंगी घटांना मागणी

नवरात्रासाठी रंगीबेरंगी घटांना मागणी

भाग्यश्री प्रधान, ठाणे
नवरात्रोत्सवात लागणारे घट पूर्णत्वास गेले असून त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या फिती, एम्ब्रॉयडरीच्या फिती, टिकल्या, कुंदन, चौकोनी व गोलाकार छोटे-मोठे आरसे, मणी, खडे आदी सजावटीच्या साहित्याने ते सजवले गेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या घटांची किंमत ५ ते १० टकक्यांनी वाढली असून कारागीर तसेच सजावटीच्या साहित्यातही २-३ रुपये वाढ झाल्याने हे घट महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर, धारावी तसेच ठाणे-कल्याण कुंभारवाड्यांत मात्र ५० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत विविध घट उपलब्ध आहेत. यातील काही घट गुजरातवरूनही आणले जातात आणि त्यानंतर या साध्या घटांवर कलाकुसर केल्याने त्यांची किंमत वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
या घटाला गरबा असेही संबोधले जाते. रात्रीच्या वेळी या गरब्याच्या छिद्रातून पडणाऱ्या मंद प्रकाशातून देवी आशीर्वाद देते, अशी समजूत असल्याने त्यांना बाजारात अधिक मागणी आहे. काही घरांमध्ये नवरात्रीच्या दिवसांत या सजवलेल्या घटांभोवती मुली फेर धरतात व तो डोक्यावर घेऊन नृत्य करतात. म्हणून या नृत्याला गरबा हे नाव पडले आहे. यातील काही घटांवर अ‍ॅक्रॅलिक कलरचा वापर करून फुले, पाने तसेच शुभचिन्ह अशी नक्षीदार डिझाइनही काढले जाते.
पूर्वी लाल रंगाचाच घट वापरण्याची पद्धत होती. मात्र, आता केशरी, पिवळा, गुलाबी या रंगांच्या घटांनाही बाजारात मागणी आहे.
या वर्षी काही घटांना एका बाजूने उघडण्यासाठी दार असून त्यामुळे दिव्यामध्ये सहजरीत्या तेल घालण्याकरिता याचा उपयोग
होत असल्याने गिऱ्हाइकांची या घटाला मागणी वाढली आहे.
हे सुबक व सुंदर घट बनविण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी
लागतो. तसेच ५० टक्के नफा
होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Demand for colorful fall for Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.