वाशी खाडीपूल ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:42 AM2018-11-19T03:42:44+5:302018-11-19T03:43:09+5:30

वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी घ्यायच्या खबरदारीच्या सूचनांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, त्या ठिकाणी आत्महत्येच्या प्रकारांसह अपघाताच्या घटना घडत असून, रविवारी पहाटे एकाचा मृत्यू झाला आहे.

 Death trap due to Vashi creek | वाशी खाडीपूल ठरतोय मृत्यूचा सापळा

वाशी खाडीपूल ठरतोय मृत्यूचा सापळा

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी घ्यायच्या खबरदारीच्या सूचनांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, त्या ठिकाणी आत्महत्येच्या प्रकारांसह अपघाताच्या घटना घडत असून, रविवारी पहाटे एकाचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांमुळे खात्याच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरू आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नवी मुंबईला मुंबईशी जोडणारा वाशी खाडीपूल गैरसोयींचे भांडार बनले आहे. पुलावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी पुरेशा उजेडाअभावी अपघात घडत आहेत. पुलावरील अंधारामुळे अपघात घडल्याने त्या ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागावरदेखील गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.
वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी अनेक त्रुटी असून, त्या दुरुस्तीसाठी सातत्याने पोलिसांकडून पाठपुरावा सुरू आहे, परंतु वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करूनदेखील गांभीर्य घेतले जात नसल्याने कायदेशीर कारवाईच्या पवित्र्यात पोलीस आहेत. सदर खाडी पुलाच्या कठड्याची उंची आवश्यकतेपेक्षा कमी आहे. यामुळे नैराश्यात असलेले अनेक जण आत्महत्येसाठी वाशी खाडीपुलाचा वापर करत आहेत. त्याकरिता मुंबईसह नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तिथपर्यंतचा प्रवास केला जात आहे. त्यांच्याकडून होणारे आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पुलाच्या कठड्याची उंची वाढवावी, अथवा त्यावर जाळी लावावी, अशी सूचना दोन वर्षांपूर्वी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केली होती. याकरिता त्यांनी खात्याच्या मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांकडेही पाठपुरावा केलेला. त्यानंतरही पीडल्ब्यूडीकडून त्याचे गांभीर्य घेण्यात आलेले नसल्याने वाशी खाडीपुलावरून आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घटना घडतच आहेत. सुदैवाने पुलालगतच्या परिसरात मासेमारी करणारे मच्छीमार मदतीला धावून येत असल्याने अनेकांची मृत्यूच्या दाढेतून सुटका झालेली आहे.
वाशी खाडीपुलावरून एखाद्याने आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यास, त्यानंतर पुढील काही दिवस त्या ठिकाणी सतत अशा घटना घडतात. त्यामुळे शहर व वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. अशा घटनांमुळे वाशी खाडीपूल हा मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. नव्या पुलालगतचा जुना पूल सध्या केवळ हलक्या वाहनांसाठी वापरला जात आहे. त्यावरदेखील रात्रीच्या वेळी काळोख पसरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. तर अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगारी कृत्येदेखील त्या ठिकाणी घडत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सदर परिसरातून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ब्राउन शुगर जप्त केले होते. यामुळे नैराश्यात असलेल्यांकडून आत्महत्या करण्यासाठी, तसेच गुन्हेगारांकडून गैरकृत्यासाठी वाशी खाडीपुलावरील गैरसोयीचा फायदा उचलला जात असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे पीडब्ल्यूडीने तिथल्या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी
होत आहे.

मच्छीमारांमुळे अनेकांना जीवदान
मागील काही वर्षांत वाशी खाडीपुलावरून आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यापैकी राजाराम जोशी व त्यांच्या सहकारी मच्छीमारांनी ३९ जणांना जीवदान दिले आहेत, तर ४४ मृतदेह बाहेर काढले आहेत.
त्या व्यतिरिक्त इतर मच्छीमारांनी देखील अनेकांचा आत्महत्येचा प्रयत्न असफल करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्याकडून देखील खाडीपुलाच्या ठिकाणी पीडब्ल्यूडीकडून सुविधांच्या बाबतीत होणाºया दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

वाशी खाडीपुलावरील दिवे बंद असल्याने अंधारात वाहने चालवताना अडचण होत असल्याच्या तक्रारी चालकांकडून प्राप्त होत आहेत. त्यानुसार यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळवण्यात आले आहे. शिवाय सहा महिन्यांपूर्वी पुलाच्या पाहणीसाठी आलेल्या शिष्टमंडळातील आमदार व अधिकाºयांच्या देखील निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे. त्यानंतरही पुलावरील पथदिवे सुरू व्हावेत यासाठी पीडब्ल्यूडीकडे पाठपुरावा सुरू आहे.
- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

Web Title:  Death trap due to Vashi creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.