राष्ट्रवादीच्या मेळाव्याला दादांची दांडी, मात्र तटकरेंनी सावरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 02:52 IST2015-09-03T02:52:50+5:302015-09-03T02:52:50+5:30
ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर झाले होते.

राष्ट्रवादीच्या मेळाव्याला दादांची दांडी, मात्र तटकरेंनी सावरले
ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर झाले होते. परंतु, प्रत्यक्षात या मेळाव्याकडे दादा फिरकलेच नाही. अर्थात, तटकरे आले. त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकसंधपणे मतभेद विसरून लोकांपर्यंत जा,
त्यांची कामे करा, असा सल्ला दिला. तसेच ठाणे महापालिकेवर राज्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.
या वर्षी होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आणि २०१७ मध्ये होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा. पैशांऐवजी विचारांची संपत्ती पाहून कार्यकर्त्यांना पदे बहाल करा, असा सल्ला त्यांनी ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि प्रदेश युवक अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांना दिला. राष्ट्रवादीला अपयश आल्याचे दु:ख नाही. राजकारणात जयपराजय होत असतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत जी आश्वासने
दिली गेलीत, ती पूर्ण न
झाल्यामुळे जनतेत प्रक्षोभ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
सत्ता मिळण्यापूर्वी विरोधी पक्षात असतांना दुष्काळी भागाचा दौरा करणाऱ्या शिवसेनेचा एकही पालकमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबरच्या दौऱ्यात सहभागी झालेला नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले तर आगामी काळात ठामपावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका जवळ आल्यावर हजारो कोटींची कामे केली जातात, याकडेही बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईत शिवसेना-भाजपची युती होती, तर काँग्रेसनेही साथ सोडली, तरीही तिथे एकहाती सत्ता जिंकणाऱ्या गणेश नाईकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. माजी उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शहराध्यक्ष नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे, सिडकोचे माजी संचालक प्रमोद हिंदुराव, ठाण्याचे माजी महापौर मोहन गुप्ते, अशोक राऊळ, नईम खान, मोहन साळवी, टीडीसीचे अध्यक्ष बाबाजी पाटील, संचालक अशोक पोहेकर आदी उपस्थित होते.