स्टील मार्केटमध्ये अंधाराचे साम्राज्य

By Admin | Updated: February 19, 2016 02:37 IST2016-02-19T02:37:54+5:302016-02-19T02:37:54+5:30

कळंबोली येथील स्टील मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट असून, याची बाहेरील राज्यात ख्याती आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा परिसर गडद अंधारात हरवला आहे

The dark empire in the steel market | स्टील मार्केटमध्ये अंधाराचे साम्राज्य

स्टील मार्केटमध्ये अंधाराचे साम्राज्य

शैलेश चव्हाण,  तळोजा
कळंबोली येथील स्टील मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट असून, याची बाहेरील राज्यात ख्याती आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा परिसर गडद अंधारात हरवला आहे. तक्रारी करूनसुद्धा या वीज पोलवरील दिवे लागत नाहीत. स्टील मार्केटमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मात्र, येथील पायाभूत सुविधांकडेही लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. यामुळे येथील व्यावसायिक आणि परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कळंबोली स्टील मार्केट परिसरात बिमा कॉम्प्लेक्स, टाटा स्टील, एसीसी सिमेंट, पनवेल प्रादेशिक कार्यालय, एमटीएनएल कार्यालय, महावितरणचे सब स्टेशन असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. त्यासाठी माल खरेदी आणि विक्रीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर वाहने येत असतात. दिवसा वाहने या परिसरात उभी राहिली की, रात्रीच्या वेळी ही वाहने रामभरोसे असतात. या परिसरात असलेल्या अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर मोजकी ठिकाणे सोडली, तर बऱ्याच ठिकाणी दिवे नसल्याने या परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. रात्री आठ वाजल्यानंतर या परिसरात कोणीही फिरकत नाही. जवळच कळंबोली रेल्वे स्थानक आहे. मात्र, परिसरात असलेल्या अंधारामुळे व गैरसोईमुळे कळंबोलीतील रहिवासी पनवेलला जाणे पसंत करत आहेत. रात्रीच्या वेळेस भुरट्या चोरांकडून कंटेनर फोडणे, स्टील चोरणे अशा घटना वारंवार घडत असून, या अंधारामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचे व्यावसायिक सांगतात. वारंवार पाठपुरावा करून संबंधित प्रशासन दखल घेत नाही, याची खंत येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: The dark empire in the steel market