घणसोलीत अपहरण नाट्य
By Admin | Updated: March 15, 2017 02:43 IST2017-03-15T02:43:16+5:302017-03-15T02:43:16+5:30
खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली दोन मुले अज्ञाताने पळवून नेल्याचा संशयित प्रकार मंगळवारी सकाळी घणसोलीत घडला.

घणसोलीत अपहरण नाट्य
नवी मुंबई : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली दोन मुले अज्ञाताने पळवून नेल्याचा संशयित प्रकार मंगळवारी सकाळी घणसोलीत घडला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात पालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. अखेर नागरिकांनी दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दोन्ही मुले एका नातेवाइकाकडे आढळून आली. त्या नातेवाईक मुलीने पालकांना कसलीही कल्पना न देताच त्या मुलांना सोबत नेले होते.
मागील काही महिन्यांपासून घणसोलीत लहान मुलांना पळवून नेल्याच्या अफवा पसरत आहेत. अशातच मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकाराने परिसरातील पालकांचा थरकाप उडाला. सिम्प्लेक्स येथील ई विंगमधून ८ ते १० वर्षांची दोन मुले घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. हा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने बेपत्ता मुलांच्या शोधकार्याला सुरवात केली. काही वेळातच संपूर्ण परिसरात या प्रकाराची चर्चा सुरू झाली. नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, एक मुलगी त्या दोन मुलांना घेऊन जाताना दिसून आली; परंतु त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, यामुळे प्रकरणाचा वेळीच उलगडा होऊ शकला नाही. अखेर पालकांनी पोलिसांकडे धाव घेवून बेपत्ता मुलांच्या शोधासाठी त्यांचीही मदत घेतली. याच वेळी त्या दोन अल्पवयीन मुलांच्या शोधात काही जण घणसोली गावात गेले असता, त्याठिकाणी दोन्ही मुले आढळून आली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी मुलगीदेखील त्यांच्यासोबत होती. या मुलीकडे चौकशी केली असता, ती त्यांचीच नातेवाईक असल्याचे उघड झाले. ती सिम्प्लेक्स परिसरात आली असता, सोबत जाताना या दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गेली होती; परंतु त्यांच्या पालकांना तिने याची कल्पना दिली नव्हती. यामुळे दोन्ही मुलांचे अपहरण झाल्याच्या शक्यतेने पालक चिंतित झाले होते. (प्रतिनिधी)