धोकादायक पुलावरून वाहतूक, अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:05 AM2019-04-01T05:05:01+5:302019-04-01T05:05:22+5:30

पनवेलमधील प्रकार : अपघाताचा धोका; संबंधित प्राधिकरणाने सूचना फलक लावून हात झटकले

Dangerous bridge traffic, the risk of accidents | धोकादायक पुलावरून वाहतूक, अपघाताचा धोका

धोकादायक पुलावरून वाहतूक, अपघाताचा धोका

Next

वैभव गायकर

पनवेल : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम-पुनर्वसन, रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आदी कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही शहरात काही धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक ब्रिटिशकालीन पूल रातोरात कोसळल्याने संपूर्ण देशभरात या घटनेची चर्चा झाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. दोन वर्षांत शेकडो पुलांचे आॅडिट करण्यात आले, तर काही पूल नव्याने उभारण्यात आले. मात्र, आजही पनवेल तालुक्यातील काही धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. पनवेलमध्ये महापालिका, सिडको, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणे कार्यरत आहेत. शहरातील काही पूल धोकादायक आहेत. मात्र, या पुलाजवळ धोकादायक असल्याचे फलक लावून संबंधित यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बिनदिक्कत पुलावरून वाहतूक सुरू आहे. खारघर, तळोजा, पनवेल आदी ठिकाणी हे धोकादायक पूल आहेत. खारघरमधून सायन-पनवेल महामार्ग गाठण्यासाठी कोपरा पुलावरून जावे लागते.
अनेक वर्षांपासून सिडकोने हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. या पुलाला पर्याय म्हणून समांतर नवीन पूल उभारण्यात आला आहे. तसेच जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याचे फलकही याठिकाणी लावले आहे. मात्र, तरी देखील या ठिकाणाहून सर्रास वाहनांची ये-जा सुरूच असते.
कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील नावडे गावाजवळ कासाडी नदीवर ब्रिटिशांनी उभारलेला पूल जीर्णावस्थेत आहे, तरीही पुलावरून अद्याप वाहनांची ये-जा सुरू आहे. एमएसआरडीसीअंतर्गत असलेल्या या पुलाला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अशाच प्रकारे कोळीवाडा येथील पूल धोकादायक असल्याचे सांगत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही पुलावरून वाहतूक होताना दिसते. धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. मात्र, तसे न होता केवळ सूचना फलक लावून संबंधित प्राधिकरण
मोकळे झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते.

दोन वर्षांनंतर धोकादायक पूल वाहतुकीस बंद
खारघर शहर ते तळोजा गावाला जोडणारा पूल दोन वर्षांपूर्वी सिडकोने धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तरी पुलावरून वाहतूक सुरूच होती. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला.

पनवेलमधील ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत दोन गावांना जोडणारे अनेक लहान पूल उभारण्यात आले आहेत. यापैकी काही पूल धोकादायक असून त्यांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची आवश्यकता आहे.
 

Web Title: Dangerous bridge traffic, the risk of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.