ग्राहकांची फसवणूक
By Admin | Updated: November 2, 2015 02:18 IST2015-11-02T02:18:54+5:302015-11-02T02:18:54+5:30
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात रिअल इस्टेटमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, हजारोंचे आर्थिक नुकसान झाले आहे

ग्राहकांची फसवणूक
पनवेल : गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात रिअल इस्टेटमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, हजारोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिल्डरांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे.
गृहनिर्माण प्रकल्प उभारताना बिनशेती परवानगी आवश्यक आहे. ती मिळेपर्यंत नियमानुसार बांधकाम करता येत नाही किंवा बुकिंगसुद्धा घेणे नियमबाह्य आहे. त्याचबरोबर जितकी घरे तितकेच बुकिंग न घेता दुप्पट- तिप्पट बुकिंग घेऊन पनवेलमध्ये या बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यवधींची माया जमवली.
नैना प्रकल्पांतर्गत या परिसराचा विकास करण्यात येत असल्याने सिडकोने अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत. त्याचबरोबर बेकायदा अनेक बिल्डिंग जमीनदोस्त केल्या. बिल्डरने पैसे घेतले मात्र घरेच दिले नाहीत, अशा अनेक तक्रारीही खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत जवळपास आठ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
एकदा क गुन्हा दाखल झाला की मग त्या बिल्डरला जाब विचारता येत नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करू नका, मात्र आमचे पैसे परत मिळवून द्या, अशी मागणी ग्राहकांकडून पोलिसांकडे करण्यात येत आहे.
वास्तविक पाहता ग्राहकांनी सगळ्या बाबी पडताळूनच पैसे देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी लोक अल्प उत्पादन गटातील असल्याने त्यांना फारसा दोष देता येत नाही. बांधकाम व्यावसायिकांच्या कागदपत्रांची तपासणी, त्याचबरोबर इतर गोष्टी पाहण्याचा अधिकार आम्हाला नाही. फसवणूक करणाऱ्यांविरोधात आम्ही गुन्हा दाखल करतो.
-विश्वास पांढरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -2