खरेदीसाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

By Admin | Updated: September 14, 2015 03:50 IST2015-09-14T03:50:41+5:302015-09-14T03:50:41+5:30

गणरायांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी गणरायांच्या मूर्तीपासून ते मखरापर्यंत आणि पूजा साहित्य

The crowd of Ganesh devotees for the purchase | खरेदीसाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

खरेदीसाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

वसई/विरार/पालघर : गणरायांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी गणरायांच्या मूर्तीपासून ते मखरापर्यंत आणि पूजा साहित्य ते सजावटीच्या सामग्रीपर्यंत खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. दुकानात आणि बाजारपेठेच्या रस्त्यांवर वावरण्यासही जागा नव्हती. अनेक दुकानांत ग्राहकांना शिरण्यासाठीदेखील प्रतीक्षा करावी लागत होती.
रविवारी बाजारपेठेत अशी गर्दी होणार, याचा अंदाज दुकानदारांनाही होता. त्यामुळे त्यांनीही तशी पूर्वतयारी केली होती. बाजारपेठेतील या गर्दीमुळे ग्राहकांना कुठेही पार्किंगसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांनी खूप लांबवर आपली वाहने पार्क करून पायीच खरेदी करणे पसंत केले. सगळ्यांना पावसाची भीती होती. परंतु, तुरळक सरीवगळता पावसानेही आज फारशी हजेरी न लावल्याने बाजारपेठेत मोठा उत्साह होता. मखरांचा बाजार प्रचंड तेजीत होता. थर्माकोल, कृत्रिम फुले, फोल्डिंगची मखरे आज तडाखेबंदी विकली गेलीत. तर, सजावटीसाठी लागणाऱ्या विजेच्या माळा आणि अन्य सामग्री यांच्याही बाजारपेठा भरपूर तेजीत होत्या. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणाला रिक्षांच्या टंचाईने गालबोट लागत होते. अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करूनही रिक्षा मिळत नव्हती. त्यातच आज भाविक खरेदीला सहकुटुंब बाहेर पडल्याने गर्दीत प्रचंड भर पडली होती. सगळ्यांचा हातात खरेदीच्या पिशव्या, वरती आभाळ भरून आलेले आणि रिक्षा मिळत नाही, अशा स्थितीत अनेकांची रखडपट्टी झाली.
रविवार असल्याने शहर बस वाहतुकीची सेवाही मंदावलेली होती. गणरायांच्या मूर्तीची आणि पूजा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानांचाही आज भरपूर सेल झाला.
मूर्ती नोंदविण्यासाठी भक्तांनी आज दाटी केल्याने विक्रेत्यांना फुरसतही नव्हती. किराणा मालाची दुकाने तसेच अन्य सामग्रीची दुकाने यांच्यासाठीही आजचा दिवस तेजीचा ठरला.
सकाळी काही काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे आजच्या खरेदीच्या उत्सहावर पाणी पडते की काय, ही धास्ती सगळ्यांना होती. परंतु, गणरायाने सद्बुद्धी दिल्याने वरूणराजाने अल्पावधीतच काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती.

Web Title: The crowd of Ganesh devotees for the purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.