एपीएमसीतील ३१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: June 20, 2016 02:41 IST2016-06-20T02:41:58+5:302016-06-20T02:41:58+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेविरोधात आंदोलन केले होते

एपीएमसीतील ३१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेविरोधात आंदोलन केले होते. व्यापाऱ्यांच्या झुंडशाहीविरोधात पालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी ३१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे व कारवाईला विरोध करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील अतिक्रमण विरोधी कारवाईचे स्वरूपाच बदलून टाकले आहे. महापालिका फेरीवाले, झोपडीधारक, प्रकल्पग्रस्त व इतर सर्वसामान्य नागरिकांवरच कारवाई करत असल्याचा समज निर्माण झाला होता. परंतु विद्यमान आयुक्तांनी श्रीमंतांनी केलेल्या अतिक्रमणांवरही हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. निष्पक्ष कारवाईमुळे कायदा सर्वांसाठी समान असल्याची जाणीव होवू लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील मसाला व्यापाऱ्यांनी पालिकेची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. या व्यापाऱ्यांनी यापूर्वी एमआरटीपीअंतर्गत नोटीस दिले होते. ५ मे रोजी सर्व अतिक्रमण २४ तासांमध्ये काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यानंतर १६ मे रोजी कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला. १४ जून रोजी पुन्हा कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी रास्ता रोको करून व गाळे बंद करून कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला. यामुळे ३१ व्यापाऱ्यांचे गाळे सील करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पोलिसांना दिले होते.
विभाग अधिकारी भरत धांडे यांनी याविषयी लेखी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ३१ व्यापाऱ्यांविरोधात शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा व अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे दाखल झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
यापूर्वी सेस वसुलीसाठी गेलेल्या मनपा अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.
आंदोलनाचे चित्रीकरण तपासले जाणार
महापालिकेने १४ जूनला कारवाई केली असताना काही व्यापाऱ्यांनी रास्ता रोको करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. चित्रीकरण व उपलब्ध छायाचित्रे तपासून कारवाईमध्ये नक्की कोणी अडथळा निर्माण केला हे तपासले जाणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
एपीएमसीमध्ये मुंढेंचा दबदबा
मुंबईमधून १९८१ मध्ये कांदा-बटाटा मार्केट नवी मुंबईत स्थलांतर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर चार मार्केट स्थलांतर झाली. तेव्हापासून सातत्याने अतिक्रमण वाढत आहे. एपीएमसी प्रशासनाचे अभय असल्यामुळे व्यापारी महानगरपालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करत होते. अतिक्रमण केल्याच्या नोटिसा देवूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट मसाला मार्केटमधील अतिक्रमणावर हातोडा टाकला. यामुळे एपीएमसीमध्ये मुंढे नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. अतिक्रमण करणारे व त्यांना अभय देणारे अधिकारी सर्वांचेच धाबे दणाणले आहे. अतिक्रमण तुटण्याबरोबर गुन्हे दाखल होण्याची भीती वाटू लागली आहे.
गुन्हे दाखल झालेल्या गाळेधारकांचा तपशील
राजेश ट्रेडिंग कंपनी
किसान कीर्ती अॅग्रो
बी. जे. कमल एंटरप्रायझेस
आर. गोपालजी आणि कंपनी
दिलीपकुमार चंदुलाल आणि कंपनी
जे. जे. अँड सन्स
पी अम्रीतलाल अँड सन्स
एस. जे. एंटरप्रायझेस
नितेशकुमार सुरेशचंद अँड कंपनी
सृष्टी सेल्स आणि सर्व्हिस
चुन्नीलाल मंगीलाल कंपनी
महेश एल दामा व एम एल दामा
ईश्वर ट्रेडर्स कंपनी
मेसर्स चावडा ब्रदर्स
हसमुखलाल धीरजलाल कंपनी
महाराणी ट्रेडिंग कंपनी
दिलीपकुमार अँड सन्स
ललित ट्रेडिंग कंपनी
पीयूषकुमार आणि कंपनी
जयाभाई पुंजीराम किराणा कंपनी
के. के. कार्पोरेशन
नरोत्तमदास हरिवल्लभदास कंपनी
नीलेश चंदू विनोद चंदू
महेंद्र अँड ब्रदर्स