नियम मोडल्यास हॉटेलांवर गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:00 AM2021-03-04T00:00:16+5:302021-03-04T00:00:23+5:30

नवी मुंबईत पोलिसांची मोहीम : प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका

Crimes against hotels for breaking the rules | नियम मोडल्यास हॉटेलांवर गुन्हे 

नियम मोडल्यास हॉटेलांवर गुन्हे 

Next



नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही कार्यवाही करण्यात येत असून यामुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 
नवी मुंबईमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. शहरातील बाजार समिती, भाजीपाला मार्केट, व्यावसायिक आस्थापना व हॉटेल्समध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. हॉटेल्स सुरू करण्यासाठी परवानगी  देताना क्षमतेपेक्षा ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. प्रवेशद्वारावर तापमान व ऑक्सिजन पातळी तपासण्यात यावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. परंतु  बहुतांश हॉटेल चालक या नियमांचे पालन करत नाहीत. हॉटेलमधील गर्दी  नियंत्रणात राहात नसल्यामुळे पोलिसांच्या पथकाने संबंधितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या दक्षता पथकाचे कर्मचारी परिसरातील हॉटेल्समध्ये जाऊन पाहणी करत आहेत. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच  कारवाई केली जात आहे. 
महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेण्यात 
आली आहे. कारवाई सुरू झाल्यामुळे आता हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, तापमान तपासण्याचे मशीन बसविण्यास सुरुवात 
केली आहे. 

एपीएमसीमध्ये सर्वाधिक कारवाई 
एपीएमसी पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल चालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील रंग दे बसंती  हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर २ मार्चला छापा टाकून जवळपास ८  जणांवर गुन्हा दाखल केला असून, हुक्कासाठीचे साहित्य जप्त केले आहे. हॉटेल किंग्ज, मॅफको मार्केटजवळील ब्ल्ययू स्टार बार ॲण्ड रेस्टॉरंट, याच परिसरातील पाम ॲटलांटिका कॅफेमध्येही हुक्का पार्लर चालविले जात  होते. तेथेही छापा टाकून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. 

चायनीज सेंटरवरही कारवाई 
नेरुळमधील चायनीज सेंटरमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या प्रकरणी पोलिसांनी चायनीज बिर्याणी व चायनीज मन या दोन सेंटरवर गुन्हे दाखल केले आहेत.
वाशीत चार गुन्हे
वाशी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातही  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कपिल, किंग्ज, संडे व मधुबन या हॉटेल व्यवस्थापनावर साथरोग अधिनियमाप्रमाणे व प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Crimes against hotels for breaking the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.