आदिवासी विद्यार्थ्यांना न्यायालयाचे समन्स

By Admin | Updated: February 29, 2016 02:08 IST2016-02-29T02:08:45+5:302016-02-29T02:08:45+5:30

आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात आंदोलन छेडल्याप्रकरणी आदिवासी विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

Court summons for tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांना न्यायालयाचे समन्स

आदिवासी विद्यार्थ्यांना न्यायालयाचे समन्स

पनवेल : आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात आंदोलन छेडल्याप्रकरणी आदिवासी विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची प्रथम सुनावणी सोमवार १ मार्च २०१६ रोजी होणार असल्याने खांदा वसाहतीमधील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रविवारी पेण पोलीस ठाण्याकडून न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
एकात्मिक विकास प्रकल्प पेण या अंतर्गत १३ आदिवासी वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांत हजारो विद्यार्थी राहतात. पण त्यांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांनी शासकीय दरबारी अर्ज, विनवण्या, मोर्चे, आंदोलने केली. पेण येथील प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांच्याशीदेखील वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. समस्यांचे निराकरण होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आॅगस्ट महिन्यात कार्यालयात भेट घेण्याकरिता गेले असता दाभाडे यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात स्वत:ला कोंडून ठेवले व काही जणांनी कार्यालयाला वेढा घातला. त्यावेळी काही शासकीय वस्तूंची मोडतोड देखील झाली. या आंदोलनात पनवेल, पेणसह कर्जत व प्रकल्पातील इतर ३५०च्या आसपास विद्यार्थी हे कार्यालयात कोंडून घेण्याच्या आंदोलनात समाविष्ठ झाले होते. तर १०० पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रकल्पाच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. पण प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. या सर्व विद्यार्थ्यांना आता न्यायालयातच्या फेऱ्या माराव्या लागणार असून, चार्जशीट दाखल झाल्याने प्रथम सुनावणी १ मार्च २०१६ रोजी होणार आहे. त्याबाबतचे समन्स पेण पोलिसांनी खांदा वसाहतीमध्ये असलेल्या आदिवासी वसतिगृहातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी अनेक जणांच्या १२वीच्या व अन्य परीक्षा सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Court summons for tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.