प्रशिक्षण केंद्राच्या कामात भ्रष्टाचार?
By Admin | Updated: March 2, 2016 02:19 IST2016-03-02T02:19:22+5:302016-03-02T02:19:22+5:30
प्रकल्पग्रस्त तरुणांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून बेलापूर येथे युवा कामगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

प्रशिक्षण केंद्राच्या कामात भ्रष्टाचार?
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्त तरुणांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून बेलापूर येथे युवा कामगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त ठेकेदार सुरेश काशिनाथ मढवी यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि मुख्य
दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे केली आहे.
सिडकोने मागील दोन अडीच वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांच्या पाल्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना स्पर्धात्मक परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर रेल्वे स्थानकाच्या सातव्या मजल्यावर प्रकल्पग्रस्त युवा कामगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राच्या उभारणीसाठी अंतर्गत सजावट, बांधकाम, प्लास्टर, फ्लोअरिंग, फर्निचर, इलेक्ट्रीकल्स वर्क आदी कामांसाठी विशेष बाब म्हणून ८६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. विशेष म्हणजे छोटी अर्थात ए २ प्रकारात मोडणारी कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देण्याचे सिडकोचे जुने धोरण आहे. परंतु या प्रशिक्षण केंद्राचे कामे करताना या धोरणाला हरताळ फासल्याचा आरोप सुरेश मढवी यांनी केला आहे. ८५ लाखांची कामे देताना मोजक्याच ठेकेदारांवर मेहरनजर करण्यात आली. कोणतेही काम काढताना नियमानुसार त्याची जाहिरात देणे गरजेचे असते. परंतु या प्रकरणात कोणतीही जाहिरातबाजी न करता परस्पर कामांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराला प्रामुख्याने सहाय्यक अभियंता अनिल रांजनगांवकर हे जबाबदार असून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मढवी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)