सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापने केला भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:30 IST2018-03-30T02:30:29+5:302018-03-30T02:30:29+5:30

पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा समितीच्या कामकाजामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे

 Corruption scandal in the Sukapur Gram Panchayat | सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापने केला भ्रष्टाचार

सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापने केला भ्रष्टाचार

पनवेल : पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा समितीच्या कामकाजामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. येथील पैशाचा वापर विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील यांनी २०१४ची विधानसभा व २०१७ची शिक्षक मतदार संघातील विधानसभा लढविण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी ठाकूर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पाणीपुरवठा समितीमार्फत मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीचा पैसा शेका पक्ष प्रवेशासाठी, दिवाळी भेट, मिठाईसाठी वापरण्यात आला. विधिमंडळात यासंदर्भात विषय उपस्थित केल्यानंतर २१ जानेवारी २०१८ रोजी ग्रामपंचायत अधिनियम १२९ नुसार ग्रामपंचायतीने गैरव्यवहार व अपहाराबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगत यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शेकापचे तालुका चिटणीस एकनाथ भोपी यांच्यामार्फत या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आले असून, त्यांच्याच मार्फत आमदार बाळाराम पाटील यांना निवडणुकीसाठी पैसा पुरविला असल्याचे सांगत, भोपी यांच्या बँक खात्याची तपासणीची मागणी केली आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे. भ्रष्टाचारात सरपंच व ग्रामसेवकदेखील समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा समितीमार्फत शेकाप कार्यकर्त्यांना कमी दरात पाण्याचे कनेक्शन दिले जाते. तर भाजपा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांकडून जादा दराची आकारणी करण्यात येत असल्याचे सांगितले.

Web Title:  Corruption scandal in the Sukapur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.