निवडणूक न लढवण्याची नगरसेवकाला धमकी, गुन्हा दाखल : विदेशातून दोनदा फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:42 IST2017-11-18T01:42:20+5:302017-11-18T01:42:29+5:30
ऐरोलीचे नगरसेवक संजू वाडे यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन येऊ लागले आहेत. निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दे, नाहीतर ठार मारू, अशा धमक्या त्यांना मिळत आहेत.

निवडणूक न लढवण्याची नगरसेवकाला धमकी, गुन्हा दाखल : विदेशातून दोनदा फोन
नवी मुंबई : ऐरोलीचे नगरसेवक संजू वाडे यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन येऊ लागले आहेत. निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दे, नाहीतर ठार मारू, अशा धमक्या त्यांना मिळत आहेत. त्याशिवाय देविदास चौगुले यांची हत्याही आपणच केली असून, तुलाही त्याच्याकडे पाठवेन, अशी धमकी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे शहरातील राजकीय हालचालींवर लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ऐरोलीचे शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे यांना दोन दिवसांत दोनदा जीवे ठार मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. दोन्ही फोन विदेशातून येत असून फोन करणारी व्यक्ती स्वत:ला रवी पुजारी असल्याचे सांगत आहे. पहिला फोन गुरुवारी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा त्यांना फोन आला असून, पुढील ४८ तासांत ठार मारण्याची धमकी दिली आहे. नगरसेवक देविदास चौगुले यालाही आपल्याच माणसाने मारले असून, तुलाही त्याच्याकडे पाठवतो, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिल्याचे वाडे यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.