मारहाण प्रकरणी नगरसेवकाला कोठडी
By Admin | Updated: October 31, 2015 00:17 IST2015-10-31T00:17:55+5:302015-10-31T00:17:55+5:30
युवा सेनेचा पदाधिकारी मकरंद म्हात्रे याच्यावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक व साथीदाराला ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी इतर फरार व्यक्तींचा नेरूळ पोलीस शोध घेत आहेत.

मारहाण प्रकरणी नगरसेवकाला कोठडी
नवी मुंबई : युवा सेनेचा पदाधिकारी मकरंद म्हात्रे याच्यावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक व साथीदाराला ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी इतर फरार व्यक्तींचा नेरूळ पोलीस शोध घेत आहेत.
गुरुवारी दुपारी कुकशेत येथे झालेल्या मारहाण प्रकरणी नेरूळ पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा युवक जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील व सहकारी विशाल पाटील यांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. गुरुवारी दुपारी मकरंद म्हात्रे याला कुकशेत येथे एकट्याला अडवून ७ ते ८ जणांनी मारहाण केली आहे. यामध्ये मकरंद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यात यापूर्वी देखील वाद झाले होते.
कुकशेतमधील काही मंदिरांवर सिडको व पालिकेची संयुक्त कारवाई झाली होती. यामध्ये मकरंद याचेही घराच्या आवारातील मंदिर
पाडण्यात आलेले. या कारवाईला त्याने नगरसेवकाला दोषी धरून निषेधाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. यावरून घटनेच्या एक दिवस अगोदर बुधवारी सूरज पाटील व त्याच्यात वाद झाला होता.
यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला पाटील यांचे कार्यकर्ते व भावांनी जबर मारहाण केली. त्यानुसार दोघांना अटक केली असून इतर फरार असलेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे कुकशेत परिसरात अद्यापही राजकीय वातावरण तणावाचे आहे. (प्रतिनिधी)