CoronaVirus News: एमआयडीसीमध्ये दोन कोरोना तपासणी केंद्रे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:51 IST2020-10-06T23:51:46+5:302020-10-06T23:51:54+5:30
कंपन्यांमध्ये शिबिरांचे आयोजन; औद्योगिक वसाहतीसाठी पाच वैद्यकीय पथके

CoronaVirus News: एमआयडीसीमध्ये दोन कोरोना तपासणी केंद्रे सुरू
नवी मुंबई : नवी मुंबई : महानगरपालिकेने ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष तपासणी शिबिरे सुरू केली आहेत. या व्यतिरिक्त दोन कायमस्वरूपी तपासणी केंद्रही सुरू केली असून, औद्योगिक वसाहतीसाठी पाच वैद्यकीय पथके तैनात केली आहे.
दिघा ते नेरुळपर्यंतच्या एमआयडीसीमध्ये साडेतीन हजारांपेक्षा जास्त कारखाने असून, चार लाखांपेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत. शहराबाहेरून नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. एमआयडीसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिकेने प्रत्येक कंपनीमध्ये तपासणी मोहीम हाती घेतली आहे. व्यवस्थापनाने मागणी केल्यानंतर मनपाचे पथक कंपनीमध्ये जाऊन तपासणी करत आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत झायडस, लुब्रिझॉल, मिलिनियम बिझनेस पार्क, माझदा कलर्स, अमाइन्स, नेरोलॉन, अपार, पार्कर, इग्लू अशा १३ कंपन्यांमध्ये शिबिर घेण्यात आले असून, १,३३३ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने, त्यांच्या लक्षणांनुसार त्यांचे विलगीकरण केले आहे. त्यांच्या संपर्कातील २४ निकटवर्तीयांची तपासणी करण्यात आलेली आहे.
एमआयडीसीमधील ठाणे, बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन (टीबीआयए) आणि टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (टीएमआयए) यांच्या कार्यालयात तपासणी केंद्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी टीबीआयएच्या केंद्रात ६९ अँटिजेन व १० आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. टीएमआयएमधील केंद्रात ६३ जणांचे अँटिजेन व ९ जणांचे आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या. त्यामध्येही ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कामगारांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनपा शिबिरांचे आयोजन करत असून, दोन केंद्रे तयार केली असून, त्याचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
रेल्वे स्टेशनसह मॉलमध्येही तपासणी
महानगरपालिकेने रेल्वे स्टेशन व मॉलमधील कर्मचाºयांचीही तपासणी सुरू केली आहे. दोन्ही ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
यामुळे येथे काम करणारे सुरक्षारक्षक व इतर कर्मचाºयांना लागण होऊ नये, यासाठी मनपाच्या वतीने ही तपासणी करण्यात येत आहे.