CoronaVirus News: पालिकेच्या ‘मिशन झीरो नवी मुंबई’ला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:38 IST2020-08-11T01:38:37+5:302020-08-11T01:38:47+5:30
जनजागृतीसाठी सहा प्रचाररथ; गृहनिर्माण सोसायटीमध्ये अँटिजेन चाचणीची सुविधा

CoronaVirus News: पालिकेच्या ‘मिशन झीरो नवी मुंबई’ला सुरुवात
नवी मुंबई : कोरोनाबाधित व्यक्तीचा वेळेत शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही अँटिजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सहा प्रचाररथ तयार केले असून, ‘मिशन झीरो नवी मुंबई’ला सुरुवात करण्यात आली आहे.
नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केली होती. यानंतर, आता ‘मिशन झीरो नवी मुंबई’ मोहीम राबविण्यात येणार आहे. कोरोनाबाधित नागरिकांचा वेळेत शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यावर भर दिला आहे. याचाच भाग म्हणून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत २२ ठिकाणी अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. यापुढे गृहनिर्माण सोसायटीमध्येही या चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय खोकला, ताप, सर्दी श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असणाऱ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. सोसयटी व वसाहतीमधील नागरिकांनी मागणी केली, तर आॅन कॉल अँटिजेन चाचणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या मिशन झीरो संकल्पनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर, झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे आदी उपस्थित होते.