CoronaVirus News: शाळांसंबंधी तक्रार करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:20 IST2020-06-17T00:20:17+5:302020-06-17T00:20:34+5:30
पालक चिंतित : शाळा बंद असतानाही शुल्काची होतेय मागणी

CoronaVirus News: शाळांसंबंधी तक्रार करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची मागणी
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे आॅनलाइन शिक्षणावर भर दिला जात असताना दुसरीकडे पालकांवर शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालक चिंतित असल्याने खासगी शाळा व पालक यांच्यात समन्वय अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शिक्षण व्यवस्थेवरदेखील परिणाम झाला आहे. तर अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असल्याने पुढील काही महिने शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. अनेक पालक तीन महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असतानाही शाळांकडून शुल्क भरण्याचा तगादा लावला जात आहे. तर शिक्षण विभागाकडूनदेखील ही बाब दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे खासगी शाळा व चिंतित पालक यांच्यात योग्य चर्चेसाठी समन्वय अधिकारी नेमण्याची मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. त्याकरिता पालिका शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुरमेकर, निखिल गावडे आदी उपस्थित होते. लॉकडाऊन संपेपर्यंत अथवा त्यानंतरच्या काही काळापर्यंत पालकांवर शुल्क भरण्यासाठी शाळांकडून दबाव टाकला जाऊ नये, अशीदेखील मागणी त्यांनी या वेळी केली.
आर्थिक पिळवणूक
कोरोनामुळे शाळा सुरू करणे शक्य नसल्याने आॅनलाइन शिक्षणावर भर दिला जात असून त्याकरिता विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित केले जात आहे. परंतु काही खासगी शाळांनी त्यातही पालकांची आर्थिक पिळवणूक चालवल्याच्या तक्रारी येत आहेत.