CoronaVirus News: रुग्णालयांच्या मनमानीला बसणार ब्रेक; आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:16 IST2020-08-12T00:16:21+5:302020-08-12T00:16:31+5:30
अनामत रक्कमही न घेण्याच्या सूचना, फी विषयीही दिले निर्देश

CoronaVirus News: रुग्णालयांच्या मनमानीला बसणार ब्रेक; आयुक्तांचे आदेश
नवी मुंबई : शहरातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी मनमानी करू नये. सर्व ठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचणी सुरू करावी. उपचारासाठी भरमसाट शुल्क आकारू नये. अनामत रक्कमही घेण्यात येऊ नये, अशा सूचना मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.
नवी मुंबईमधील खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व रुग्णालयांसाठी नवीन आदेश जारी केले आहेत. प्रत्येक रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू ठेवावी. तत्काळ अँटिजेन चाचण्या सुरू कराव्या. यासाठी आवश्यक किट्स मनपा उपलब्ध करून देणार असून, रुग्णांकडून शुल्क आकारू नये. प्रत्येक रुग्णालयातील ८० टक्के बेड मनपा नियंत्रित करणार आहे. त्या बेडसाठीचे शुल्क शासनाने निश्चित केल्याप्रमाणेच असेल. रुग्णालयात प्रवेश देताना अनामत रक्कम घेण्यात येऊ नये. आर्थिक निकषावर कोणालाही उपचारापासून वंचित ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. थेट रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही रुग्णास प्रवेश नाकारू नये. रुग्णाचे आॅक्सिजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्या रुग्णांना प्रवेशापासून वंचित ठेवू नये. बेड उपलब्ध नसल्यास इतर ठिकाणी बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्णालयातील ट्रायज विभागात ठेवून उपचार सुरू ठेवावे.
रुग्णालयातील पीपीई किट, गाइडर व इतर वैद्यकीय उपकरणांचे दर हाफकीनसारख्या मान्यताप्राप्त संस्थेने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त नसावे. साहित्याचे दर खरेदी खर्चाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. रुग्णांसाठी जेनेरिक औषधांचा वापर करण्यात यावा.
बिलामध्ये सर्व उपकरणे, वस्तू, औषधे यांची सविस्तर यादी दरासह देण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
पैशासाठी मृतदेह अडवू नका
उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास बिलासाठी मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यास टाळाटाळ करू नये.
तत्काळ सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.
स्मार्ट फोन वापराची परवानगी
रुग्णालयात रुग्णांना स्मार्ट फोन, टॅब्लेट वापरण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून रुग्णांना कुटुंबीयांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधता येईल. रुग्णालयात पीपीई किट्सचा खर्च प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र आकारू नये. वार्डमधील एकूण रुग्णसंख्येच्या प्रमाणात विभागण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.