CoronaVirus News: नवी मुंबई महानगरपालिका वाढविणार व्हेंटिलेटरची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:34 IST2020-06-18T01:34:39+5:302020-06-18T01:34:48+5:30
सीएसआर फंडाचाही वापर करणार; राज्य सरकार करणार मदत

CoronaVirus News: नवी मुंबई महानगरपालिका वाढविणार व्हेंटिलेटरची संख्या
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, महानगरपालिकेने रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतील विशेष रुग्णालयासाठी शासन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार असून, सीएसआर फंडातूनही खरेदी करण्यात येणार आहे.
नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या ४,१८९ झाली आहे. यामधील २,४५७ रुग्ण बरे झाले असून, सद्यस्थितीमध्ये १,६0३ जणांवर मनपा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांपैकी हे प्रमाण तीन टक्के आहे. कोरोनामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे. व्हेंटिलेटरची संख्या कमी पडू लागली आहे. आयसीयू विभागात जागा अपुरी पडत आहे. अनेक रुग्णांना आवश्यकता असतानाही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याची तक्रारही होऊ लागली आहे. महानगरपालिकेने वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये १,२00 बेडचे विशेष कोरोना रुग्णालय उभारले आहे. यामुळे सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेसे बेड उपलब्ध झाले आहेत. साहजिकच आता मनपाने व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
वाशीतील विशेष रुग्णालयात ५0 बेड्सचा आयसीयू विभाग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विभागात व्हेंटिलेटर शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सद्यस्थितीमध्ये मनपाकडे २८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. १0 व्हेंटीलेटर्सची लवकरच खरेदी केली जाणार आहे. सीएसआर आणि इतर निधीतून व शासनाकडून जवळपास २0 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यामुळे मनपाकडील युनिटची संख्या ५८ होणार आहे. नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात कोरोनासाठी बेड वाढविण्यात येणार आहेत. तेथेही महानगरपालिका व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार आहे. शहरवासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
नवी मुंबईमधील सद्यस्थिती पुढीलप्रमाणे
एकूण चाचणी १५,७३७
एकूण पॉझिटिव्ह ४,१८९
एकूण निगेटिव्ह १0,९२९
कोरोनामुक्त २,४५७
मृत्यू १२९
होम क्वारंटाईन ९,७९५
क्वारंटाईन पूर्ण ३५,१0३
महापालिकेने वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये १,२00 बेडचे विशेष कोरोना रुग्णालय उभारले आहे.