CoronaVirus Lockdown News: Hotel ban in Navi Mumbai stops women's food and vegetables | CoronaVirus Lockdown News: नवी मुंबईतील हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली

CoronaVirus Lockdown News: नवी मुंबईतील हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बंद तर झालेच परंतु हॉटेल, कॅटरर्स बंद असल्याने या ठिकाणी पोळी भाकरी पुरविणाऱ्या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. उदर्निवाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे शहरातून मूळगावी स्थलांतरित झाली असून उपासमार थांबण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने काही कडक निर्बंध लादले आहेत. नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर अनेक महिने लॉकडाऊन घेण्यात आला होता. या काळात अनेकांचे रोजगार बंद झाले. शहरातील हॉटेल, कँटिन आणि कॅटरर्सला पोळी भाकरी पुरविणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लॉकडाऊन काळात हॉटेल, पोळी भाजी केंद्र, बंद होते. तसेच लग्न, वाढदिवसासारख्या कार्यक्रमांवर देखील निर्बंध आणण्यात आले होते, त्यामुळे कॅटरर्स सुविधा देखील बंद होती. याकाळात यासर्व ठिकाणी पोळी, भाकरी पुरविणाऱ्या महिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील जिकिरीचे झाले होते. नोव्हेंबर महिन्यापासून लॉकडाऊनच्या नियमात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यावर हळूहळू परिस्थिती सुधारत असताना मार्च २०२१ पासून पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली त्यामुळे एप्रिल महिन्यापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा विविध समस्या निर्माण होऊ लागल्या असून या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. रोजगार बंद असल्याने वर्षभर थकलेले घरभाडे, वीज बिल, मुलांचे शिक्षण, औषोपचार आदी समस्या निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे मूळ गावी स्थलांतरित झाली आहेत. शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

वर्ष कसे काढले आमचे 
आम्हालाच ठाऊक
गेल्यावर्षी लॉकडाऊन घेण्यात आला त्यावेळी आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली होती. परंतु कोरोनाबाबत मनात खूप भीती असल्याने ओळखीच्या काही लोकांकडून उसने पैसे घेऊन उदरनिर्वाह केला.
कोरोनामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्याने काही समाजसेवकांकडून अन्न धान्याचे किट मिळाले. या काळात खूप हलाखीचे दिवस काढले तरी कर्जाचा डोंगर झाला असून वर्षभरापासून घरभाडेदेखील थकले आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून काही प्रमाणात व्यवसाय सुरु झाल्याने मागील लॉकडाऊन काळात घेतलेले कर्ज डिसेंबर महिन्यात दागिने विकून फेडले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आता पुन्हा निर्बंध आणले असून हॉटेल, कँटिन बंद आहेत त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून हॉटेल, कॅटरर्स बंद असल्याने काम नाही. मिस्टरांचा रोजगार देखील बंद आहे. डिसेंबर महिन्यापासून काही प्रमाणात काम सुरू झाले होते. परंतु एप्रिल महिन्यापासून पुन्हा बंद झालं आहे. घरभाडे, मुलांचा शिक्षण आदी समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाल्या असून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
- सुवर्णा महाजन

गेले वर्षभर हॉटेल बंद असल्याने रोजगार पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रुक्मिणी भगत 

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोळी पुरविण्याचा व्यवसाय जवळपास पूर्णपणे ठप्प आहे. अनेक महिला इतर कामासाठी देखील प्रयत्न करत आहेत परंतु याकाळात काम मिळत नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले आहे.
- संध्या सोनावणे 

Web Title: CoronaVirus Lockdown News: Hotel ban in Navi Mumbai stops women's food and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.