Corona Vaccine : पनवेलमध्ये कोविशिल्डचा साठा एका दिवसात संपला, कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस मात्र मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 00:21 IST2021-04-14T00:20:48+5:302021-04-14T00:21:05+5:30
Corona Vaccine: पनवेल महापालिकेला सोमवारी ५००० कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. दोन दिवसात हे डोस संपुष्टात आल्याने पालिकेने पुन्हा लसीकरण थांबवले होते.

Corona Vaccine : पनवेलमध्ये कोविशिल्डचा साठा एका दिवसात संपला, कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस मात्र मिळणार
पनवेल : लसींचा अपुरा साठा पुन्हा संपुष्टात आला असून पनवेल महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागला आहे. अपुऱ्या साठ्याअभावी महापालिकेने खाजगी रुग्णालयातील लसीकरण थांबवले असून बुधवारी केवळ शासकीय केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू राहणार आहे.
पनवेल महापालिकेला सोमवारी ५००० कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. दोन दिवसात हे डोस संपुष्टात आल्याने पालिकेने पुन्हा लसीकरण थांबवले होते. मंगळवारी लसींसाठी केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र साठा संपुष्टात आल्याने अनेकांना भर उन्हात रिकाम्या हाती घरी परतावे लागले. लसीकरण सुरु झाल्यापासून अडथळ्यांचे सत्र सुरूच आहे. शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. बुधवारी पनवेल येथील महापालिकेच्या प्राथमिक नागरी केंद्रावर हे लसीकरण होणार आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. मात्र पहिल्या डोससाठी लाभार्थ्यांना आणखी वाट बघावी लागणार आहे.