Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:38 AM2021-04-10T01:38:52+5:302021-04-10T01:39:07+5:30

लसीकरण थांबल्यामुळे नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

Corona Vaccination: All vaccination centers in Navi Mumbai closed | Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा

Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महानगरपालिकेकडील लसीचे डोस संपल्यामुळे शहरातील सर्व ४२ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. नवीन डोस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागो स्पष्ट केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त  केली आहे.  
          
नवी मुंबई पालिकेने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना लस उपलब्ध व्हावी, यासाठी तब्बल ४२ केेंद्रे सुरू केली होती. यामध्ये मोफत लस देणारी पालिकेची २६ व सशुल्क लस देणाऱ्या १६ खासगी केंद्रांचा समावेश होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४३ हजार ७२१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते. शुक्रवारी सकाळपर्यंत फक्त ५०० डोस उपलब्ध हाेते. यामुळे मनपाच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू होते. वाशी रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. दुपारनंतर डोस संपल्यानंतर शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. 

पालिकेने रोज १० हजार जणांना लस देता येईल, असे नियोजन केले आहे. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांची एकत्रित नोंदणी करण्याची तयारी होती. नागरिकांना घराजवळ लस घेता यावी, यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रे, ऐरोली, वाशी व नेरुळमधील मनपा रुग्णालय व खासगी रूग्णालयांमध्ये लस उपलब्ध केली होती. शासनाकडून जास्तीत जास्त डोस उपलब्ध व्हावे, यासाठीही पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु वेळेत डोस न मिळाल्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले आहे.

वाशीच्या महापालिका रुग्णालयात गर्दी
नवी मुंबई : कोरोना लसींचा डोस घेण्यासाठी नागरिकांनी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शुक्रवारी दुपारी एकच गर्दी केली होती. सामाजिक अंतर न राखल्यामुळे कोविड नियमांचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ आणि वाशी येथील अनेक नागरिकांना लसीचा साठा संपल्यामुळे निराश होऊन परतावे लागले. नवी मुंबईत एका दिवसाला ८ हजारांहून अधिक लोकांना डोस दिले जातात. आतापर्यंत दीड लाखाहून अधिक जणांनी लसीचे डोस घेतल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

लस नसल्याने जावे लागले परत 
कोरोना लस मिळावी, यासाठी नागरिक लसीकरण केंद्रांना भेट देत आहेत. परंतु सलग दोन दिवस लस संपल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे अनेकांना नाराज होऊन घरी परत जावे लागले. लस केव्हा येणार, याविषयीही नागरिक विचारणा करू लागले आहेत. परंतु आरोग्य विभागास ठोस माहिती नसल्यामुळे त्यांना नागरिकांना काहीही आश्वासन देता येत नसल्याचे पाहावयास मिळत होते.

Web Title: Corona Vaccination: All vaccination centers in Navi Mumbai closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.