दिघी पोर्टला पाणी देण्यास विरोध
By Admin | Updated: October 5, 2015 00:34 IST2015-10-05T00:34:13+5:302015-10-05T00:34:13+5:30
दिघी पोर्टसह दिघी, कुडगाव, हरवित या गावांसाठी तसेच कुडकी लघुपाटबंधारे गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे.

दिघी पोर्टला पाणी देण्यास विरोध
बोर्ली-पंचतन : दिघी पोर्टसह दिघी, कुडगाव, हरवित या गावांसाठी तसेच कुडकी लघुपाटबंधारे गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या योजनेस याआधीही वडवली, कुडकी, गोंडघर, भावे गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासंदर्भात वडवली ग्रामस्थांचा विरोध होवू नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण उपविभाग माणगांव यांच्याकडून वडवली ग्रामपंचायतीला पत्र पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यालयाच्यावतीने केले आहे. यावर वडवली, गोंडघर, कुडकी, भावे, शिस्ती येथील ग्रामस्थांची सभा घेण्यात आली. या सभेत दिघी पोर्ट व इतर गावांसाठी कुडकी धरणातून पाणी न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असून प्रशासन जर दिघी पोर्टसाठी कुडकी धरणातून पाणी देत असेल तर आम्ही मागे हटणार नाही, वेळ पडल्यास तीव्र आंदोलनही छेडू असा निर्णय सभेत घेण्यात आला आहे.
दिघी पोर्ट हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर श्रीवर्धन तालुक्यामध्ये विकसित होत आहे.दिघी गाव, कुडगाव, हरवित या गावांसाठी दिघीपासून सुमारे १२ किमीवरील कुकडी धरणातून नळपाणी पुरवठा योजना मंजूर आहे. त्या योजनेस वडवली, कुडकी, गोंडघर, भावे या गावातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध यापूर्वीही होता, याआधी या योजनेसाठीची विहीर अक्षरश: धरणामध्येच खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी वडवली येथील काही ग्रामस्थांनी या योजनेला विरोध करीत दोन वर्षापूर्वीच योजनेचे काम बंद पाडले होते. नुकतेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना उपविभाग माणगाव यांच्याकडून वडवली ग्रामपंचायतीला पत्र पाठवून ग्रामस्थांचा विरोध होवू नये व योजनेचे काम सुरळीत सुरू व्हावे यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यालयाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करण्यात आले आहे.
कुडकी धरणातून दिघी पोर्ट व तीन गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेस वडवली, कुकडी, गोंडघर, भावे, शिस्ते ग्रामस्थांचा प्रखर विरोध असून प्रसंगी आम्ही तीव्र आंदोलनही छेडू असे वडवली येथे झालेल्या पाच गावांच्या सभेमध्ये एकमुखाने ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)