ठेकेदारांची बिले थेट खात्यात
By Admin | Updated: June 1, 2016 03:05 IST2016-06-01T03:05:27+5:302016-06-01T03:05:27+5:30
महापालिकेमधील ठेकेदारांची बिले थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. यासाठी होस्ट टू होस्ट प्रणाली राबविणारी

ठेकेदारांची बिले थेट खात्यात
नवी मुंबई : महापालिकेमधील ठेकेदारांची बिले थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. यासाठी होस्ट टू होस्ट प्रणाली राबविणारी नवी मुंबई राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. यामुळे पालिकेच्या कामांना गती येणार असून, पारदर्शकता वाढणार आहे.
राज्यातील श्रीमंत महापालिकेमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या पालिकेमध्ये प्रत्येक वर्षी करोडो रुपयांची विकासकामे केली जात आहेत. केलेल्या कामांची बिले घेण्यासाठी रोज लेखा विभागात ठेकेदारांची गर्दी दिसत असते. साफसफाई, देखभाल व इतर अनेक कामांची बिले प्रत्येक महिन्याला द्यावी लागतात. सरासरी महिन्याला एक हजारपेक्षा जास्त धनादेश द्यावे लागतात. धनादेश घेण्यासाठी ठेकेदारांना पूर्ण दिवस पालिकेत तिष्ठत बसावे लागत होते. याशिवाय विनाकारण मध्यस्थांची संख्या वाढल्याने काही घटकांना खूशही करावे लागत होते. महापालिकेचा कारभार हायटेक झाला असला तरी बिले देण्यासाठी जुनीच पद्धत राबविली जात होती. ठेकेदारांनीही बिलांची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठीची यंत्रणा असावी, अशी मागणी करण्यास सुरवात केली होती. महापालिका प्रशासनाने बिले थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यापूर्वीही स्पष्ट केले होते. परंतु गत २५ वर्षांमध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्रशासनाची मानसिकता नसल्यानेच बिले थेट बँकेत जमा केली जात नव्हती. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करण्याचे स्पष्ट केले आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता यावी व कामे गतीने व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असून, त्याचा भाग म्हणून ठेकेदारांची बिले थेट बँकेत जमा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
महापालिका आयुक्तांनी मुख्यालयामध्ये होस्ट टू होस्ट प्रणालीचा शुभारंभ केला. अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून हा पॉवर अॅक्सेस कार्यान्वित केला जात आहे. आरटीजीएस या संगणकीय प्रणालीपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स क्लीअरिंग सिस्टीम ही होस्ट टू होस्ट प्रणाली अधिक अत्याधुनिक आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबविली जात असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामाचे धनादेश घेण्यासाठी महापालिका मुख्यालयामध्ये येण्याची गरज नाही. कामाची बिले सादर केल्यानंतर त्यांची रक्कम थेट बँकेत जमा केली जाणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून, कामाकाजात पारदर्शकता येणार आहे. आरटीजीएसपेक्षा प्रभावी
नवी मुंबई महानगरपालिकेने ठेकेदारांची बिले थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी होस्ट टू होस्ट या आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ही प्रणाली राबविणारी नवी मुंबई पहिली महापालिका ठरणार आहे. ठेकेदारांची बिले थेट बँकेत जमा करण्यासाठी अनेक ठिकाणी आरटीजीएस प्रणाली राबविली जात आहे. परंतु त्याहीपेक्षा होस्ट टू होस्ट ही प्रणाली अत्याधुनिक आहे. यामुळे महापालिकेचे कामकाज अधिक गतीने होणार आहे.